विदर्भ, दुरांतो अन् राजधानी एक्सप्रेस फुल्ल; दिवाळीनंतरची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 07:22 PM2020-11-22T19:22:17+5:302020-11-22T19:22:43+5:30
Train Nagpur News कोरोनामुळे वेटिंगचे तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने नाकारली आहे. नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ, दुरांतो एक्स्प्रेस फुल्ल असून बंगळूर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस मध्ये ही वेटिंग ची स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीचा सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी अनेक जण आपापल्या गावाकडे आले. परंतु परतीच्या प्रवासात मात्र त्यांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. कोरोनामुळे वेटिंगचे तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने नाकारली आहे. नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ, दुरांतो एक्स्प्रेस फुल्ल असून बंगळूर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस मध्ये ही वेटिंग ची स्थिती आहे.
दिवाळीनंतर केवळ तीन ते चार रेल्वेगाड्यातच बर्थ रिकामे आहेत. विदर्भातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे त्यामुळे विदर्भ आणि दुरांतो एक्सप्रेसमध्ये वेटिंग ची स्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांना दिवाळीनंतर आपापल्या कामाच्या ठिकाणी परतण्यासाठी खासगी वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत हीच स्थिती राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
या गाड्या आहेत फुल्ल
नागपुरातून जाणाऱ्या ०२७९१ सिकंदराबाद-दानापूर एक्स्प्रेस, ०२८३३ अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस, ०२२९६ दानापूर बंगलोर संघमित्रा एक्सप्रेस, ०२१०६ गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस, ०२६९१ बंगळूर नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस आदी गाड्यात आरक्षण फुल्ल झाले आहे. तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांच्या हाती वेटिंगचे तिकीट पडत असल्यामुळे त्यांचा नाईलाज होता आहे.
या गाड्यात आहेत बर्थ शिल्लक
नागपुरातून जाणाऱ्या नागपूर जबलपुर एक्सप्रेस या गाडीतही ३०० च्या वर शिल्लक आहेत. रेल्वे गाडी क्रमांक ०२२८५ सिकंदराबाद निजामुद्दीन एक्सप्रेस या गाडीत तसेच ०२६२५ केरला एक्सप्रेस मध्येही प्रवाशांना आरक्षण मिळत आहे.
१२५ पैकी ६० गाड्याच सुरू
कोरोनचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी नागपुरातून १२५ च्या जवळपास रेल्वेगाड्या धावत होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रेल्वेत मार्च महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा केली. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ६० विशेष रेल्वे गाड्या धावत आहेत. नियमित रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय अद्याप रेल्वे प्रशासनाने घेतला नाही.
दिवाळी छ्ट पूजेमुळे आरक्षण फुल्ल
दिवाळी आणि छट पूजेमुळे रेल्वे गाड्यात आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. दिवाळी मधील गर्दी आणि छट पूजा संपल्यानंतर परिस्थिती पूर्वीसारखी होईल.
_एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे नागपूर विभाग