यंदा पीक विम्यासाठी विदर्भातील शेतकरी अनुत्साही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:11 AM2018-07-28T11:11:40+5:302018-07-28T11:13:10+5:30
पिकांचे झालेले नुकसानाची भरपाई देताना विमा कंपन्यांच्या आडमुठ्या भूमिकेचा शेतकऱ्यांना आलेला प्रत्यय आणि यंदा पाऊस चांगला झाल्याने पीकही चांगले होण्याची शक्यता लक्षात घेता पीक विमा काढण्यासाठी शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिकांचे झालेले नुकसानाची भरपाई देताना विमा कंपन्यांच्या आडमुठ्या भूमिकेचा शेतकऱ्यांना आलेला प्रत्यय आणि यंदा पाऊस चांगला झाल्याने पीकही चांगले होण्याची शक्यता लक्षात घेता पीक विमा काढण्यासाठी शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच कृषी विभागाने पीक विम्याची तरीख ३१ जुलैपर्यंत वाढवून दिली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१८ अंतर्गत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे.
कर्जदार शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पिकांचा विमा उतरविणे आवश्यक आहे. तालुकानिहाय पीक हंगामासाठी आठ अधिसूचित पिकांसाठी संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे.
यामध्ये हंगामी पिकांसाठी २ टक्के तर नगदी पिकांसाठी ५ टक्के विमा हप्ता रक्कम निश्चित केली असून सर्व पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के निश्चित केलेला आहे. परंतु शेतकऱ्यांचा पाहिजे तसा उत्साह दिसून येत नाही. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी उत्सुक नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी विमा कंपन्यांची एकूणच भूमिका ही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची नसल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना वेळोवेळी आलेला आहे.
त्यामुळेच शेतकरी विमा काढण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. दरम्यान खरीप हंगामातील सर्व पिकांच्या संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलैपूर्वी सहभागी होऊन पिकांचा विमा उतरविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे.