संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रात उद्योग वाढीसाठी विदर्भ अनुकूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:35 AM2018-07-18T01:35:47+5:302018-07-18T01:39:05+5:30

संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उद्योगवाढीसाठी विदर्भ आणि नागपूरमध्ये अतिशय पोषक वातावरण असून, या क्षेत्रातील उद्योजकांनी विदर्भात गुंतवणूक करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Vidarbha is favorable for industrial growth in defense and aerospace sector | संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रात उद्योग वाढीसाठी विदर्भ अनुकूल 

संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रात उद्योग वाढीसाठी विदर्भ अनुकूल 

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असो.ची परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उद्योगवाढीसाठी विदर्भ आणि नागपूरमध्ये अतिशय पोषक वातावरण असून, या क्षेत्रातील उद्योजकांनी विदर्भात गुंतवणूक करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या ‘मेड इन विदर्भ इन डिफेन्स अ‍ॅण्ड एरोस्पेस शिखर परिषदेत’ मुख्य अतिथी म्हणून फडणवीस बोलत होते. यावेळी विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष माजी लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे, स्लोव्हाकियाच्या यूडीएस कंपनीचे अध्यक्ष थॉमस मॅरोस, टाटा टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आनंद भदे, भारत अर्थ मुव्हर्स लि.चे वित्तीय संचालक सुरेश प्रकाश, भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.चे व्यवस्थापकीय अध्यक्ष दिनेश बत्रा आणि सोलर इंडस्ट्रीज इंडिया लि.चे अध्यक्ष सत्यनारायण नवाल उपस्थित होते.
उद्योगासाठी उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता
आगामी काळात संरक्षण क्षेत्रात उद्योगासाठी मोठी संधी आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सत्यनारायण नवाल हे या क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व आहे. एरोस्पेस उद्योग वाढविण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. या क्षेत्रात नाविन्यपूर्णतेसोबतच रोजगाराची नवी दालने युवकांसाठी खुली होत आहे, ही बाब निश्चित सुखावणारी आहे. संरक्षण आणि एरोस्पेस उद्योग क्षेत्र वाढण्यासाठी विदर्भात मोठ्या संधी आहेत. मिहानमध्ये रिलायन्सचा एरोस्पेस निर्मिती कारखाना सुरू होत आहे. केवळ एअर क्राफ्टचे सुटेभाग विदर्भात तयार होण्यापेक्षा संपूर्ण एअरक्राफ्ट येथे तयार होण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी संबंधित उद्योगाच्या आवश्यक तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी स्लोव्हाकियाच्या यूडीएस कंपनी, इंडो स्लोव्हा चेंबर आॅफ कॉमर्स, टाटा टेक्नॉलॉजी तसेच महाराष्ट्र शासन आणि विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनच्या संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
संचालन माजी मेजर जनरल अनिल बाम यांनी तर आभार विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनचे दुष्यंत देशपांडे यांनी मानले. यावेळी विदर्भातील उद्योजक, गुंतवणूकदार उपस्थित होते.

Web Title: Vidarbha is favorable for industrial growth in defense and aerospace sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.