Heat Wave : विदर्भाला नेहमीच बसले एप्रिलच्या उन्हाचे चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 10:17 AM2022-04-02T10:17:57+5:302022-04-02T10:27:10+5:30
हवामान विभागाच्या रेकाॅर्डनुसार एप्रिलमध्ये दिवसाचे कमाल तापमान दिवसागणिक वाढते. ४०, ४२ अंशँवरून ते ४५ अंशांपर्यंत पाेहोचते. दिवस आणि रात्रीच्या तापमानात माेठे अंतर असते. रात्रीचे किमान तापमान २२ ते २६ अंशांपर्यंत असते
निशांत वानखेडे
नागपूर : एप्रिलचा महिना कायमच विदर्भासह महाराष्ट्रासाठी तापदायक ठरणारा असताे. मार्चमध्ये डाेक्यावर असलेला सूर्य नंतर मध्य प्रदेश व राजस्थानकडे सरकत जाताे; पण विदर्भाचे चटके काही कमी हाेत नाहीत. या महिन्यात सरासरी तापमान ४२ ते ४५ अंशांपर्यंत पाेहोचते; तर कधीकधी ते ४७ अंशांच्या पार गेले आहे. २००९ साली ३० एप्रिलला नागपूरचा पारा ४७.१ अंशांवर हाेता; तर २०१९ ला अकाेला व आसपासचा पारा ४७.२ अंशांवर गेला हाेता.
विषुववृत्तीय भाैगाेलिक परिस्थितीनुसार विदर्भ हा तापमान संवेदनशील भाग आहे आणि एप्रिल व मे महिना प्रचंड चटके देणारा असताे. या वर्षी मात्र मार्चमध्येच नागरिकांना सूर्याचा प्रकाेप सहन करावा लागताे आहे. सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून ही तीव्रता एप्रिलमध्ये अधिक वाढण्याची भीती आहे. हवामान विभागाच्या रेकाॅर्डनुसार एप्रिलमध्ये दिवसाचे कमाल तापमान दिवसागणिक वाढते. ४०, ४२ अंशँवरून ते ४५ अंशांपर्यंत पाेहोचते. दिवस आणि रात्रीच्या तापमानात माेठे अंतर असते. रात्रीचे किमान तापमान २२ ते २६ अंशांपर्यंत असते. तज्ज्ञांच्या मते या महिन्यात पावसाची शक्यताही असते. मात्र या वर्षी ती शक्यता कमीच असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे यावर्षी एप्रिल महिना प्रचंड तापणार असल्याचे संकेत आहेत. मेमध्ये ही तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज आहे.
गेल्या १० वर्षांत कसे हाेते एप्रिलचे तापमान?
वर्ष - २०१२ - २०१३ - २०१४ - २०१५ - २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१
नागपूरचा पारा - ४३.२ - ४४.७ - ४३.७ - ४४.५ - ४५ - ४५.५ - ४५.२ - ४५.३ - ४३.४ - ४३.१
अकाेला पारा - ४३.३ - ४४.६ - ४४.५ - ४२.७ - ४५ - ४५ - ४५ - ४७.२ - ४३.९ - ४३.४
१९३७ साली विदर्भात हाेता पाऊस
नागपूरला २००९ साली व अकाेल्यात २०१९ साली तापमान ४७ अंशांच्या पार गेले आहे. या महिन्यात पारा हिवाळ्याप्रमाणे खालीही आला आहे. १ एप्रिल १९६८ रोजी नागपूरचे कमाल तापमान १३.९ अंशांपर्यंत खाली आले हाेते. अकाेल्यामध्ये याच दिवशी १९०५ साली तापमान ११.१ अंशांवर घसरले हाेते. १९३७ साली विदर्भात सर्वत्र पाऊस हाेता. या वर्षी १९ एप्रिलला नागपुरात ५९.४ मि.मी., तर अकाेल्यात ५८.७ मि.मी. पावसाची नाेंद झाली. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात नागपुरात १२९ मि.मी., तर अकाेल्यात ७२.४ मि.मी. पाऊस झाला हाेता.