विदर्भात उशिरा आलो, हा आरोप चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:45 AM2017-11-20T01:45:56+5:302017-11-20T01:48:31+5:30

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी वैदर्भीय मतदारांच्या भेटी घेतल्या, मात्र राजन खान यांनी आतापर्यंत विदर्भात पाऊल ठेवले नव्हते.

Vidarbha has come late, this allegation is wrong | विदर्भात उशिरा आलो, हा आरोप चुकीचा

विदर्भात उशिरा आलो, हा आरोप चुकीचा

googlenewsNext
ठळक मुद्देराजन खान : मी संपूर्ण महाराष्टÑाचा प्रतिनिधी

ऑनलाईन लोकमत 
नागपूर : अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी वैदर्भीय मतदारांच्या भेटी घेतल्या, मात्र राजन खान यांनी आतापर्यंत विदर्भात पाऊल ठेवले नव्हते. त्यामुळे राजन खान यांचे विदर्भाकडे दुर्लक्ष असून ते वैदर्भीय मतदारांना महत्त्व देत नाहीत, अशी टीका त्यांच्यावर होत होती. त्यावर राजन खान यांनी या आरोपांचे खंडन केले. मी विदर्भ, मराठवाडा किंवा प. महाराष्ट्राचा सुपुत्र नाही तर अख्ख्या महाराष्ट्रचा प्रतिनिधी आहे. या धावपळीत कदाचित भेटायला उशीर झाला, मात्र मी माझी भूमिका साहित्य महामंडळ व मतदारांपर्यंत पत्रव्यवहाराद्वारे पोहचविली आहे, असा खुलासा त्यांनी रविवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
समाज आणि साहित्याची सेवा करणे हे साहित्यिकाचे काम असते व ते आतापर्यंत मी प्रामाणिकपणे करीत आलो आहे. संमेलनाचे अध्यक्षपद लाभाचे पद नाही, मात्र मराठी जनमानसांच्या दृष्टीने सन्मानाचे मानले जाते. त्यामुळे संमेलन अध्यक्ष झालो तर या साहित्य सेवेच्या कामाला नवा आयाम मिळेल. मात्र निवडणूक लढवत असलो तरी कुणाशी ईर्षा, असूया किंवा स्पर्धा नाही.
त्यामुळे जिंकलो तरी अत्याधिक खूश होणार नाही किंवा हरलो तर निराशही होणार नाही. साहित्य हा जगण्याचा प्रवास असून तो पुढेही असाच सुरू राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत अध्यक्षपदाच्या प्रचलित निवडणुकीवरून टीका होत आहे. मात्र सध्यातरी हीच प्रक्रिया सुरू असल्याने ती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मात्र भविष्यात ही पद्धत बदलेल आणि गुणवत्तेच्या आधारावर निवड होईल, असेही ते म्हणाले.

हा किळसवाणा प्रकार दुरुस्त करायचा आहे
अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये चालणारे गटातटाचे खेळ, प्रादेशिक वादामुळे साहित्य संमेलन बदनाम झाले आहे. संमेलनाकडे सामान्य माणसे कुचेष्टेने पाहू लागले आहेत. अध्यक्षपदासाठी अमूक व्यक्ती किंवा साहित्य संघटनांची लांगुलचालन करावे लागणे किंवा उमेदवाराने संमेलनासाठी प्रायोजकत्व मिळवून देण्याची भाषा करणे, हा साहित्यसृष्टीतील किळसवाणा प्रकार आहे. साहित्य ही पावित्र्याची गोष्ट आहे, मात्र अशा प्रकारामुळे किळसवाणे होत आहे. त्यामुळे सामान्य मराठी माणूसच नाही तर दिग्गज साहित्यिकही इथे येऊ इच्छित नाही. मलाही तसेच सल्ले दिले गेले आहेत. मात्र ही साहित्यसृष्टी व या संस्था माझ्या आहेत. त्यामुळे माझे घर दुरुस्त करणे माझी जबाबदारी असल्याने मी निवडणूक लढवीत असल्याचे राजन खान यांनी यावेळी सांगितले.
कर्नाटक सरकारची भूमिका घटनाविरोधी
कर्नाटकच्या सीमा भागातील लोकांवर कानडी भाषेची सक्ती करणे ही कन्नड सरकारची भूमिका घटनाविरोधी आहे. महाराष्ट शासनाने कधी शासकीय स्तरावर इतर भाषांचा द्वेष केला नाही, उलट सन्मानच केला आहे. महाराष्ट्राची ही भूमिका कन्नड शासनाला समजावून सांगण्यासाठी लेखकांचा दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. संमेलनाचा अध्यक्ष झाल्यावर हा एक प्रयत्न करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Vidarbha has come late, this allegation is wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.