राज्याच्या तुलनेत विदर्भात कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:10 AM2020-07-27T10:10:48+5:302020-07-27T10:18:06+5:30
या महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत गेल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे, असे असले तरी विदर्भात बरे होण्याचे प्रमाण राज्याच्या तुलनेत जास्त आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात जून महिन्यापासून रुग्णसंख्येचा वेग वाढला. हजार रुग्ण गाठण्याचे दिवस ७० वरून १५ दिवसावर आले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला हे प्रमाण आठ दिवसावर होते, मात्र आता ते तीन दिवसावर आले आहे. या महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत गेल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे, असे असले तरी विदर्भात बरे होण्याचे प्रमाण राज्याच्या तुलनेत जास्त आहे. राज्यात शनिवारी ५६.५५ टक्के तर विदर्भात ६६.७५ टक्के रुग्ण बरे झाले होते.
विदर्भात झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या आरोग्य यंत्रणेसमोर चिंतेची बाब ठरली आहे. २२ जुलै रोजी बाधितांनी १० हजाराचा आकडा ओलांडला होता, तर २५ जुलै रोजी बाधितांची संख्या ११,५३३ वर पोहचली होती. यातील ७,६९९ रुग्ण बरे झाले तर, ३,५२५ रुग्ण उपचाराखाली आहेत. सध्या सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आहेत. रुग्णांची संख्या ३,८३७ तर बरे झालेल्यांची संख्या २,३९२ आहे.
नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण अकोला जिल्ह्यात आहेत. २,३८३ रुग्णांची नोंद झाली असून, १९६६ रुग्ण बरे झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात १६३६ रुग्णांमधून १०६६ रुग्ण बरे, बुलडाणा जिल्ह्यात ९४४ रुग्णांमधून ५८६ रुग्ण बरे, यवतमाळ जिल्ह्यात ७१८ रुग्णांमधून ४५१ रुग्ण बरे, गडचिरोली जिल्ह्यात ५१० रुग्णांमधून २५४ रुग्ण बरे, वाशीम जिल्ह्यात ५०० रुग्णंमधून २५४ रुग्ण बरे, चंद्रपूर जिल्ह्यात ३८१ रुग्णांमधून २२० रुग्ण बरे, गोंदिया जिल्ह्यात २४४ रुग्णांमधून २१७ रुग्ण बरे, भंडारा जिल्ह्यात २२३ रुग्णांमधून १७९ रुग्ण बरे तर वर्धा जिल्ह्यात १५७ रुग्णांमधून ८८ रुग्ण बरे झाले आहेत.
जूनच्या तुलनेत जुलैमध्ये बरे होण्याचा टक्क्यात घट
जुलै महिन्यात रुग्णसंख्या वाढल्याने जून महिन्याच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत किंचित घट आली आहे. परंतु बरे होणाºया रुग्णांची संख्या पुन्हा वाढेल, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मार्च महिन्यात २१ रुग्ण होते, यातील ७ रुग्ण बरे झाले, बरे होण्याचे प्रमाण ३३.३३ टक्के होते. एप्रिल महिन्यात ३२० रुग्ण होते, तर ८२ रुग्ण बरे झाले, प्रमाण २५.६२ टक्के होते. मे महिन्यात रुग्णांची संख्या १७११ होती. यातील ११५४ रुग्ण बरे झाले, प्रमाण ६७.४४ टक्के होते. जून महिन्यात ४,६४३ रुग्णांची संख्या होती, यातील ३,५२३ रुग्ण बरे झाले, प्रमाण ७५.८७ टक्के होते, तर २५ जुलैपर्यंत ११,५३३ रुग्ण होते, यातील ७,६९९ रुग्ण बरे झाले, बरे होण्याचे हे प्रमाण ६६.७५ टक्के आहे.