मराठी विश्वकोश निर्मिती आणि साहित्य-संस्कृती मंडळावर विदर्भाला नगण्य स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:48+5:302021-05-28T04:07:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि साहित्य व संस्कृती मंडळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि साहित्य व संस्कृती मंडळ अध्यक्ष व सदस्यांची घोषणा करण्यात आली. या दोन्ही मंडळांवर विदर्भातून एक-एक सदस्य निवडला गेल्याने वैदर्भीय साहित्य क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळावर डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ३० सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या सदस्यांमध्ये विदर्भातून डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. विश्वकोष निर्मिती मंडळावर डॉ. श्रीधर उपाख्य राजा दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या २५ सदस्यांमध्ये विदर्भातून केवळ रवींद्र रुक्मिणी रवींद्रनाथ यांचाच समावेश आहे.
--------
विदर्भ सोडलेल्यांना वैदर्भीयांनीही सोडले का?
दोन्ही मंडळांवर निवडण्यात आलेल्या सदस्यांमध्ये काही माजी वैदर्भीय साहित्यिक व मराठी भाषा अभ्यासकांचा समावेश आहे. त्यात प्रेमानंद गजवी, नागनाथ कोतापल्ले यांच्यासारख्यांचा समावेश आहे. त्यांनी विदर्भ सोडण्याची कारणे वैयक्तिक होती. मात्र, विदर्भप्रेम त्यांनी कायम जपले आहे. मात्र, वैदर्भीय साहित्यिक त्यांना वैदर्भीय मानत नाही का, असा सवाल उपस्थित व्हायला लागला आहे.
-------
द्वादशीवार यांच्यानंतर विदर्भाला अध्यक्षपद नाहीच
- प्रा. डॉ. सुरेश द्वादशीवार हे १९९९-२००० या काळात साहित्य व संस्कृती मंडळावर अध्यक्ष होते. काही कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हापासून या मंडळावर विदर्भातून अध्यक्ष लाभले नाहीत.
---------
विदर्भात गुणवत्ता नाही का?
गेल्या काही टर्ममध्ये या दोन्ही मंडळांवर तीच ती नावे, तेच ते अध्यक्ष बघतो आहोत. अशाने नवीन लोकांना संधी कधी मिळणार? विदर्भात ११ जिल्हे आहेत आणि प्रत्येक वेळी एक किंवा दोन सदस्य अशी स्थिती असते. सगळ्या जिल्ह्यांना समान न्याय या नात्याने प्रत्येक जिल्ह्यातून एक सदस्य घेणे अपेक्षित आहे, अन्यथा विदर्भ तोडून तरी टाका.
- डॉ. मनोज तायडे, अमरावती
.......