असंतुष्टांची ‘विदर्भ इंदिरा काँग्रेस’ची तयारी
By admin | Published: November 5, 2016 03:01 AM2016-11-05T03:01:47+5:302016-11-05T03:01:47+5:30
शहर कार्यकारिणीच्या घोषणेनंतर नागपुरात काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून समोर आली.
मुत्तेमवार, ठाकरे यांच्यावर नाराजी : दुसरा पक्ष स्थापणार
नागपूर : शहर कार्यकारिणीच्या घोषणेनंतर नागपुरात काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून समोर आली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजांना विश्वासात घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून झाला नाही. यामुळे दुखावलेल्या असंतुष्ट नेत्यांनी आता ‘विदर्भ इंदिरा काँग्रेस’ या नावाने दुसरा पक्षच काढण्याची तयारी चालविली आहे. विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावरील नाराजीतून उठलेले हे लोण विदर्भभर पसरले असून विविध कारणांनी काँग्रेसवर नाराज असलेले नेतेही या दुसऱ्या पक्षाच्या बांधणीत हातभार लावण्यास तयार असल्याची माहिती आहे.
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत, आ. सुनील केदार यांच्यासह विदर्भातील काही नेत्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार संबंधित नेत्यांनी यासाठी विदर्भातील नेत्यांशी संपर्कही साधला आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर दबाव निर्माण करण्याचाही या मोहिमेचा हेतू असल्याचे बोलले जात आहे. नागपूर शहर कार्यकारिणीच्या घोषणेनंतर माजी मंत्री नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती.
विधानसभा निवडणुकीत राऊत यांच्या विरोधात काम करणाऱ्यांना कार्यकारिणीत घेण्यात आले असून संबंधितांना तत्काळ पदमुक्त करावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी लावून धरली होती. या मागणीसाठी राऊत समर्थकांनी शहर काँग्रेसच्या तीन बैठकांवर बहिष्कार टाकला. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचेही काही समर्थक बैठकीला अनुपस्थित राहिले. दुसरीकडे सलग तीन बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्यांना पदमुक्त करण्याचा ठराव शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी कार्यकारिणीच्या तिसऱ्या बैठकीत मंजूर करून प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला. त्यामुळे राऊत, चतुर्वेदी आणखीनच दुखावले. कार्यकारिणी तयार करताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही. आपल्या समर्थकांना कमी महत्त्वाची पदे देण्यात आली, असे राऊत, चतुर्वेदी समर्थकांकडे बोलून दाखवित आहेत. आम्ही पक्षश्रेष्ठींना हे सर्व कळविले आहे. आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर आमच्याकडे दुसरा पक्ष काढण्याशिवाय पर्याय राहणार नाही, या टोकापर्यंत हे नेते पोहचले असल्याची माहिती आहे. असे झाले तर नागपुरात इतिहासाची पुनरावृत्ती होईल व पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘पंजा’ गोठवले जाऊ शकते, असा या नेत्यांच्या समर्थकांचा दावा आहे. याबाबत नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)