विदर्भाच्या आर्थिक विकासासाठी 'खासदार औद्योगिक महोत्सव'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 09:03 PM2020-02-15T21:03:53+5:302020-02-15T21:04:57+5:30
‘खासदार औद्योगिक महोत्सव’ हा राष्ट्रीय महोत्सव आहे. या माध्यमातून विदर्भातील कृषी व ग्रामीण उद्योगावर भर देण्यासह या क्षेत्राच्या विकासाचे लक्ष्य आहे. या माध्यमातून युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘खासदार औद्योगिक महोत्सव’ हा राष्ट्रीय महोत्सव आहे. या माध्यमातून विदर्भातील कृषी व ग्रामीण उद्योगावर भर देण्यासह या क्षेत्राच्या विकासाचे लक्ष्य आहे. या माध्यमातून युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
खासदार औद्योगिक महोत्सवांतर्गत राष्ट्रीय औद्योगिक परिषद आणि प्रदर्शनाचे तीन दिवसीय आयोजन सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, आमदार निवास आणि डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे १४ ते १६ मार्च या कालावधीत होणार आहे. महोत्सवाची माहिती देताना गडकरी म्हणाले, एमएसएमई देशाच्या विकासाचा कणा असून उद्योगात २९ टक्के वाटा आणि ४८ टक्के निर्यात आहे. त्यात महाराष्ट्र आणि गुजरातचा ५५ टक्के वाटा आहे. लघू उद्योगासाठी केंद्राच्या अनेक योजना आहेत. मार्केटिंगसाठी मंत्रालयातर्फे पोर्टल तसेच वेबसाईट तयार करून लघु उद्योगांनी तयार केलेल्या मालाची विक्री करण्यात येणार आहे. पैठणीची विक्री देशातील पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून करण्यात येईल. याकरिता बोलणी सुरू आहे. गडकरी म्हणाले, युवकांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रकल्पाच्या कागदपत्रांची सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
महोत्सवात एमएसएमईचा विकास आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. सोलर चरख्याद्वारे ज्या गावात कापूस तयार होतो, तिथेच कापड तयार होईल. याद्वारे एकाच तालुक्यात चार हजार लोकांना रोजगार मिळेल. खादी ग्रामोद्योगाद्वारे हा प्रकल्प राबविला जाईल. तसेच आंधळगावात पैठणी कशा तयार होतील, यावर भर आहे. गडकरी म्हणाले, काश्मीरच्या बारामुल्ला येथे खादीचे रुमाल तयार होतात. नागपुरात उप्पलवाडी येथे रेडिमेड गारमेंटमध्ये ७०० मुली काम करीत आहेत. नागपुरात दाल मिल आणि रामटेकमध्ये राईस क्लस्टर तयार केले आहे. बांबू मिशनने विकास होणार आहे. ग्रामीण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी साखरेऐवजी मधाचा उपयोग करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.
देशात विविध लघु व मध्यम उद्योगांची उलाढाल एक हजार कोटींवर आहे. या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतो आहे. उद्यमशीलता वाढत आहे. तालुका स्तरावर लघु उद्योग सुरू होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. युवकांनी रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे व्हावे, असे गडकरी म्हणाले.
एमएसएमई-डीआयचे संचालक डॉ. प्रशांत पार्लेवार म्हणाले, उद्घाटन १४ मार्चला सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हजर राहतील. समारोप १६ मार्चला सायंकाळी ६ वाजता गडकरी यांच्या हस्ते होईल. महोत्सवात सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या नामांकित कंपन्यांचे १०० पेक्षा जास्त स्टॉल राहतील. यामध्ये ऑटोमोबाईल, अॅग्रो फूड, प्लास्टिक, बांबू मिशन, सोलर चरखा आदींसह विविध क्लस्टरवर भर देण्यात येणार आहे. सोबतच नवउद्यमींसाठी नामांकित उद्योजकांचे मार्गदर्शनपर आणि बी-बी सत्र राहणार आहेत.
पत्रपरिषदेत आ. मोहन मते, रवी बोरटकर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर, खादी ग्रामोद्योग नागपूरचे संचालक डॉ. कापसे उपस्थित होते.
खादीचे घड्याळ!
टायटन कंपनीने खादीचे घड्याळ तयार केले आहे. त्या घड्याळाचा बेल्ट आणि डायल खादीचे आहे. दिल्लीत लॉन्च केले आहे. घड्याळ इको-फें्रडली आहे. पुरुष आणि महिलांसाठी टायटनच्या शोरूममध्ये विक्रीस आहे. खादी ग्रामोद्योगतर्फे विक्री करण्यात येत आहे.
मिहानमध्ये मोजतो लाईटची संख्या!
मिहानचा विकास वेगाने होत आहे. नवीन उद्योगही येत आहेत. त्यामुळे रोजगार निर्मिती वाढली आहे. विमानातून नागपूर विमानतळावर उतरतो तेव्हा मिहानमध्ये किती लाईट लागले आहेत, त्याची संख्या मोजतो. लाईटची संख्या नेहमीच वाढलेली दिसते. पतंजलीचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे गडकरी म्हणाले.