विदर्भातील नेत्यांच्या दंडबैठका सुरू; फडणवीस-पटोले, मुनगंटीवार-वडेट्टीवार सामना रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 08:00 AM2022-11-17T08:00:00+5:302022-11-17T08:00:10+5:30

Nagpur News तब्बल तीन वर्षांनी नागपुरात होत असलेले हिवाळी अधिवेशन विदर्भातील नेत्यांकडून तापवले जाण्याची चिन्हे आहेत.

Vidarbha leaders sit in court; Fadnavis-Patole, Mungantiwar-Vadettiwar match will be played | विदर्भातील नेत्यांच्या दंडबैठका सुरू; फडणवीस-पटोले, मुनगंटीवार-वडेट्टीवार सामना रंगणार

विदर्भातील नेत्यांच्या दंडबैठका सुरू; फडणवीस-पटोले, मुनगंटीवार-वडेट्टीवार सामना रंगणार

googlenewsNext
ठळक मुद्देबावनकुळे, यशोमती ठाकूर लढविणार किल्ला

नागपूर : तब्बल तीन वर्षांनी नागपुरात होत असलेले हिवाळी अधिवेशन विदर्भातील नेत्यांकडून तापवले जाण्याची चिन्हे आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर विदर्भातील विविध प्रश्नांवरून विरोधक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, आदी नेते जोरकस प्रयत्न करतील. त्यांना रोखण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सरकारची ढाल म्हणून परफॉर्म करताना दिसतील.

महाविकास आघाडीला सत्तेची अडीच वर्षे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सळो की पळो करून सोडले होते. आता फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी त्यांच्याकडे बरीच महत्त्वाची खाती आहेत; त्यामुळे त्या खात्यांवर नेम साधून फडणवीसांची कोंडी करण्याचा विरोधकांचा बेत असेल. नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे कोणत्या वेळी कोणता बाण मारावा, याचा त्यांना चांगला अनुभव आहे. विजय वडेट्टीवार यांनाही विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे ते विदर्भातील विविध प्रश्नांवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेले दिसतील. यशोमती ठाकूर यादेखील आक्रमक मूडमध्ये आहेत. गेली अडीच वर्षे मंत्री म्हणून झालेल्या त्रासाचा हिशेब घेण्याची संधी या सर्वांना आहे.

असे आहेत विरोधकांच्या भात्यातील बाण

- वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ नागपूरचा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेला.

- अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान.

- धानाला बोनस, कापूस खरेदी, कृषी भारनियमन.

- ओबीसींचा प्रश्न कायम आहे.

- विदर्भाचा अनुशेष वाढतो आहे.

- अर्धवट सिंचन प्रकल्पांसाठी निधी देण्याची गरज.

- राज्यात अजूनही पूर्ण मंत्रिमंडळ कार्यरत नाही.

विकासकामांवरील स्थगिती गाजणार

- महाविकास आघाडी सरकार कोसळताच सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने विविध विकासकामांवर स्थगिती दिली होती. जिल्हा नियोजन समित्यांना अद्याप विकास निधी वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे विकासकामे खोळंबली आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याची तयारी केली आहे.

Web Title: Vidarbha leaders sit in court; Fadnavis-Patole, Mungantiwar-Vadettiwar match will be played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.