विदर्भाने कुशल नेतृत्व गमावले
By admin | Published: September 11, 2015 03:35 AM2015-09-11T03:35:22+5:302015-09-11T03:35:22+5:30
माझे वडील जवाहरलालजी दर्डा यांचे ते सहकारी होते. माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध होते. लोकमतवर त्यांचे मनापासून प्रेम होते. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ नेता व लोकमतचा मित्र गमावला आहे.
माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांच्या निधनाबद्दल मान्यवरांच्या शोकसंवेदना
नागपूर : माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांच्या निधनाने विदर्भाने एक कुशल नेतृत्व गमावले आहे. काँग्रेस वर्तुळात बौद्धिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. लोकसभेत शोषित वंचितांची बाजू सक्षमपणे मांडताना विकासाच्या प्रश्नांवर ते तेवढेच आक्रमक असायचे. त्यांनी केलेले कार्य समाजाच्या सतत स्मरणात राहील, अशा शोकसंवेदना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
आंबेडकरी विचारांचे नेतृत्व हरपले
माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांच्या निधनाने आंबेडकरी विचारांचे नेतृत्व हरपले आहे. शैक्षणिक आणि कामगार क्षेत्रातही त्यांनी मोठे काम केले होते. एक लेखक म्हणूनही आपला ठसा उमटवला होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
-देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री
शोषितांचे प्रश्न सोडविणारा नेता
राजकारण आणि समाजकारणात सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू असावा, असे बाळकृष्ण वासनिक नेहमी सांगायचे. दलित शोषितांचे प्रश्न सोडविताना कुठल्याही प्रलोभनाला बळी पडायचे नाही व वैयक्तिक स्वार्थ ठेवायचा नाही हे दुर्मिळ मूल्य त्यांनी जपले. राजकारणात वैयक्तिक मतभेद असावेत पण व्यक्तिगत मैत्रीमध्ये ते आड येऊ नयेत या विचाराला प्रामाणिक राहिल्यामुळेच काँग्रेस पक्षात राहूनही विविध राजकीय पक्षातील नेत्यांसोबत त्यांची मैत्री कायम होती. शोषित वंचितांचे प्रश्न सोडविणारा एक ज्येष्ठ नेता आपण गमाविला आहे.
-नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री
शैक्षणिक व कामगार क्षेत्राची हानी
माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांच्या निधनाने शैक्षणिक व कामगार क्षेत्रात काम करणारे एक समर्थ नेतृत्व आपणातून हरविले आहे. त्यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने केली. दलितांना आरक्षण मिळावे यासाठी लोकसभा गाजविली होती. ते विदर्भाचे कट्टर समर्थक होते. समता सैनिक दलाचा कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी केलेले कार्य समाजाच्या सतत स्मरणात राहील.
-चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री, महाराष्ट्र शासन
निष्ठावंत काँग्रेसी
बाळकृष्ण वासनिक हे राष्ट्रीय विचाराचे नेते होते. ते काँग्रेसशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. काँग्रेसच्या संकटाच्या काळात ते भक्कमपणे सोबत होते. राजकीय प्रलोभनाचे अनेक प्रसंग येऊनही ते त्याला बळी पडले नाही. लोकसभेत शोषित वंचितांची बाजू सक्षमपणे मांडताना विकासाच्या प्रश्नांवरही ते तेवढेच आक्रमक असायचे. चिरंजीव व काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल यांच्याबद्दल त्यांना खूप अभिमान वाटायचा. वासनिक परिवाराचा काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा वारसा माझा मुलगा प्रामाणिकपणे पुढे नेत आहे, असे ते नेहमी सांगायचे. माझे वडील जवाहरलालजी दर्डा यांचे ते सहकारी होते. माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध होते. लोकमतवर त्यांचे मनापासून प्रेम होते. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ नेता व लोकमतचा मित्र गमावला आहे.
-विजय दर्डा, राज्यसभा सदस्य
चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड
विदर्भाच्या प्रश्नांना वाचा फोडली
माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांना विदर्भातील काँग्रेसचे सर्वाधिक तरुण खासदार म्हणून त्यांना त्याकाळी ओळखलं जायचं. लोकसभेत आपल्या प्रभावी वक्तृत्त्वाचा ठसा उमटवून त्यांनी विदर्भाच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती. वासनिक हे वेगळ्या विदर्भ राज्याचे खंदे पुरस्कर्तेही होते. एक सदाबहार, मनमिळावू मार्गदर्शक हरविला आहे.
-विलास मुत्तेमवार, माजी केंद्रीय मंत्री
विदर्भाने एक कुशल नेतृत्व गमावले
माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांच्या निधनाने विदर्भाने एक कुशल नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या नेतृत्वात अनेक कामे करण्याचे भाग्य मिळाले.त्यांच्या निधनामुळे विदर्भाचे मोठे नुकसान झाले आहे.
-अनिस अहमद, माजी मंत्री
बहुआयामी व्यक्तिमत्त्व
बाळकृष्ण वासनिक हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांना काँग्रेस वर्तुळात बौद्धिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. १९७५ मध्ये त्यांनी नागपुरात वीस कलमी कार्यक्रमाबाबत परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेला संजय गांधी आणि सहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यांचा कार्याचा व्याप मोठा होता. आम्ही सर्व त्यामुळे प्रभावित झालो होतो.
-गेव्ह आवारी, माजी खासदार