विदर्भात महाविकास आघाडी ६२ पैकी ४५ जागा जिंकणार, विजय वडेट्टीवार यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 12:39 PM2023-08-10T12:39:32+5:302023-08-10T12:39:32+5:30
म्हणाले, फडणवीस यांच्यावर पुन्हा विरोधी पक्षात बसण्याची वेळ येणार
नागपूर : विदर्भात विधानसभेच्या ६२ जागांपैकी ४५ जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल. गेल्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. त्यानंतर निवडणुका झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षात बसावे लागले. यावेळीही तसेच होईल. फडणवीस यांना पुन्हा विरोधी पक्षात बसावे लागेल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
वडेट्टीवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा जनता विरोधी पक्षाकडे आशेने पाहते. पावसाळी अधिवेशनात आपल्याला पुरेसा वेळ मिळाला नाही. पण नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मला नाईट वॉचमन म्हणून हिणवत आहेत. पण कधी कधी नाईट वॉचमन सेंच्युरी काढतो. गेल्यावेळी मी विरोधी पक्षनेते असताना १५ जागाही येणार नाहीत, असा दावा केला जात होता. मात्र ४५ जागा आल्या. आता चित्र पालटलेले दिसेल. राज्यात सत्ता आल्यास हायकमांडच्या नजरेतील कॅप्टन कोण असेल, हे मला सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस फुटणार नाही
- शिवसेना, राष्ट्रवादी हे प्रादेशिक पक्ष फोडून त्यांचे चिन्ह घालविण्याचा भाजपने प्रयत्न केला. पण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे त्याचा ‘पंजा’ कसा घालविणार, असा सवाल करीत काँग्रेस फुटणार नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
ओबीसींची नागपुरात महारॅली
- काँग्रेसतर्फे नागपुरात ओबीसींची महारॅली आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे. या रॅलीसाठी देशभरातील ‘इंडिया’ आघाडीच्या ओबीसी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले जाईल. या रॅलीमध्ये जातनिहाय जनगणनेसाठी एल्गार पुकारला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्यातील आरक्षणाची ५० टक्क्यांची सीमा हटवून तामिळनाडूप्रमाणे ७० टक्के करावी. त्यानंतर वाढीव आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
वडेट्टीवार म्हणाले.....
- बच्चू कडू यांच्यावर आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. ते सरकार विरोधात आंदोलन करू लागले आहेत. येत्या काळात ते महाविकास आघाडीसोबत असतील.
- महाराष्ट्राकडे वाटचाल करू पाहणारी भारत राष्ट्र समिती तेलंगणातच फुटली आहे. बीआरएसची महाराष्ट्रातील एन्ट्री ही सत्ताधारी पुरस्कृत आहे.
- आधी शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. तरी भाजपचा ग्राफ वाढलेला नाही. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्वरित निवडणुका घ्या.