विदर्भ, मेल, दुरांतो रद्द, तीन रेल्वेगाड्या वळविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 09:28 PM2021-07-22T21:28:34+5:302021-07-22T21:29:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे अंतर्गत कसारा घाटात रेल्वे रुळावर दगड, माती आल्यामुळे आणि रेल्वे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे अंतर्गत कसारा घाटात रेल्वे रुळावर दगड, माती आल्यामुळे आणि रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे टिटवाळा-कसारा रेल्वे सेक्शनमध्ये रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा परिणाम नागपूरच्या रेल्वेगाड्यांवरही पडला. विशेष म्हणजे विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवाशांची गैरसोय झाली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे कसारा घाटात रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे मुंबईवरून गुरुवारी मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल आणि मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी या गाड्या नागपुरात येणार नाहीत. नागपूरवरून गुरुवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आणि हावडा-मुंबई मेल नियोजित वेळेनुसार नियोजित मार्गाने रवाना करण्यात आल्या. मुसळधार पावसामुळे बुधवारी नागपूरवरून रवाना झालेली नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस भुसावळपर्यंत चालविण्यात आली तर गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस चाळीसगावपर्यंत चालविण्यात आली. त्याच प्रमाणे नागपूर-दादर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकमध्ये शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. या तीन्ही गाड्यांपैकी दुरांतो एक्स्प्रेस आणि विदर्भ एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन नागपुरात आल्या तर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकवरून नागपूरसाठी रवाना करण्यात आली
वळविलेल्या मार्गाने धावल्या रेल्वेगाड्या
मध्य रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा स्पेशल ही गाडी वळविलेल्या वसई रोड, नंदुरबार, जळगाव या मार्गाने चालविली. तर पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस फेस्टिव्हल स्पेशल आणि हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशलला वळविलेल्या जळगाव, नंदुरबार, वसई रोड या मार्गाने चालविण्यात आले. त्यामुळे या गाड्या विलंबाने धावल्या असून प्रवाशांची गैरसोय झाली.
रेल्वेस्थानकावर हेल्पलाईन बूथ, बसेसची व्यवस्था
मुसळधार पावसामुळे वळविलेल्या मार्गाने आणि शॉर्ट टर्मिनेट झालेल्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर पॅसेंजर हेल्पलाईन बूथ सुरु करण्यात आले. याशिवाय गैरसोय झालेल्या प्रवाशांसाठी चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मुंबई रेल्वे प्रशासनाने २९ बसेसमधून १२९० प्रवाशांना कसारावरून कल्याणला रवाना केले तर ४४ बसेसच्या माध्यमातून २८६० प्रवाशांना इगतपुरीवरून कल्याणला आणण्यात आले. भुसावळ आणि चाळीसगावमध्ये शॉर्ट टर्मिनेट झालेल्या दुरांतो आणि विदर्भ एक्स्प्रेसच्या ५३० प्रवाशांना परत नागपूरला पाठविण्यात आले.
३३ रेल्वेगाड्या डायव्हर्ट, ४८ रद्द
मध्य रेल्वे झोनने दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे तसेच रेल्वे रुळावर माती, दगड आल्यामुळे महाराष्ट्रातील ३३ रेल्वेगाड्या डायव्हर्ट कराव्या लागल्या तर ५१ रेल्वेगाड्या शॉर्ट टर्मिनेट, ४८ रेल्वेगाड्या रद्द आणि १४ रेल्वेगाड्या शॉर्ट ओरिजनेट करण्यात आल्या.
मुसळधार पावसामुळे प्रवास केला रद्द
‘मुंबईला महत्वाच्या कामासाठी जात होतो. जाताना नागपूर-मुंबई दुरांतोचे आणि येताना मुंबई-नागपूर दुरांतोचे कन्फर्म तिकीट होते. परंतु मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अडकुन पडण्याची शक्यता असल्यामुळे प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला.’
-निखील बोंडे, प्रवासी