निधी वाटप ‘फार्म्युल्या’ने झाले विदर्भ-मराठवाड्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:17 AM2018-03-10T10:17:51+5:302018-03-10T10:20:39+5:30
विकास मंडळांतर्गत विदर्भ व मराठवाड्यासाठी असलेल्या निधी वाटप फॉर्म्युल्याला विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य कपिल चंद्रायण यांनी आव्हान दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकास मंडळांतर्गत विदर्भ व मराठवाड्यासाठी असलेल्या निधी वाटप फॉर्म्युल्याला विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य कपिल चंद्रायण यांनी आव्हान दिले आहे. या फॉर्म्युल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागाचे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अजूनही पुणे विभागालाच सर्वाधिक वाटप होत आहे.
चंद्रायण यांनी राज्यपालांना पत्र लिहून या फॉर्म्युल्यामध्ये बदल करण्याची विनंती केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सिंचन विकासासाठी निधी वाटप करण्यासाठी राज्यपाल क्षेत्रवार निकष देतात. अर्थसंकल्पात त्याचे पालन केले जाते. या निकषामंध्ये संबंधित क्षेत्रातील लोकसंख्या हा आधार धरला जातो. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रदेशालाच याचा सर्वाधिक लाभ मिळतो. विदर्भ व मराठवाड्याला आवश्यक निधी मिळत नाही.
चंद्रायण यांनी ही समस्या दूर करण्यासाठी एक नवीन फॉर्म्युला सुचविला आहे. तो म्हणजे शहरी लोकसंख्या ऐवजी केवळ ग्रामीण भागातील लोकसंख्या विचारात घेण्यात यावी. पेरणी लायक क्षेत्राला २५ टक्के प्राथमिकता देण्यात यावी. २५ टक्के हे सिंचन क्षेत्राच्या उपलब्धतेलाही धरले जावे. हे पत्र त्यांनी २० फेब्रुवारी रोजी लिहिले आहे. यासंबंधात राज्यपाल कार्यालयातील अधिकाऱ्याशी मौखिक चर्चा झाली आहे. हे पत्र अर्थसंकल्पाच्या काही दिवसापूर्वीच पाठवल्याने या वर्षात यावर पुढाकार घेण्यात आलेला नाही. पुढच्या वर्षी या फॉर्म्युल्यावर चर्चा होऊ शकते.