विदर्भ निर्माण महामंच लढणार सर्व जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:07 AM2019-03-15T01:07:32+5:302019-03-15T01:08:38+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भ निर्माण महामंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन हा महामंच स्थापन केला असून या अंतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भ निर्माण महामंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन हा महामंच स्थापन केला असून या अंतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार आहेत.
विदर्भ निर्माण महामंचामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी), विदर्भ माझा, शेतकरी संघटना, लोकजागर पार्टी, जनसुराज्य पार्टी, लोक जागर पार्टी, रिपाइं (खोरिप) आणि प्रॉवटिस्ट ब्लॉक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीसह विविध विदर्भवादी संघटना मागील काही वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करीत आहेत. परंतु काँग्रेस आणि भाजप दोघेही स्वतंत्र विदर्भ राज्य देण्यास टाळाटाळ करीत असल्याने आता विदर्भवादी संघटनांनी स्वत:च निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र विदर्भ निर्माण व्हावे, या एकमेव मागणीसाठी आणि उद्दिष्टांसह हा महामंच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. उमेदवारांबाबत चर्चा सुरू असून उमेवारांची यादी अंतिम टप्प्यात आहे. या महामंचमध्ये सहभागी असलेल्या आम आदमी पार्टीने मागची लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यावेळी आपच्या दोन्ही उमेदवारांनी चांगली मते घेतली होती. नागपुरातून अंजली दमानिया यांनी तब्बल ६९,०८१ मते घेतली होती. त्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. तर रामटेकमधून लढलेले प्रताप गोस्वामी यांनी २५,८८९ मते घेतली होती. यंदा आम आदमी पार्टी महामंचमध्ये असल्याने त्याचा फायदा महामंच व आपला किती होतो हे येणारा काळ सांगले.
या नावांवर चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भ निर्माण महामंच अंतर्गत नागपुरातून बीआरएसपीने दावा केला आहे. त्यांच्यातर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने हे नागपुरातून लढणार आहेत. त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जाते. त्याचप्रकारे चंद्रपूर येथून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अॅड. वामनराव चटप आणि बीआरएसपीचे अॅड. दशरथ मडावी, रामटेक येथून विदर्भ माझाचे राजकुमार तिरपुडे, यवतमाळ येथील विदर्भ राज्य आघाडीचे अॅड. श्रीहरी अणे, आपतर्फे वसंतराव ढोके, भंडारा येथून देवीदास लांजेवार, झेड.एम. दूधकोअर गुरुजी, वर्धा येथून लोक जागर पार्टीचे कवी ज्ञानेश वाकुडकर, बुलडाणा येथून अभयसिंग पाटील आणि मेजर अशोक राऊत आदी नावांची चर्चा सुरू आहे.
उमेदवारांची आज घोषणा
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या प्रश्नावर काँग्रेससह भाजपनेही फसवणूक केली आहे. त्यामुळे आता विदर्भ निर्माण महामंच स्वत: निवडणुकीला सामोरा जाणार आहे. विदर्भ निर्माण महामंच हा तिसरा पर्याय म्हणून सक्षमपणे उभा राहील. विदर्भातील सर्व दहा जागा लढवण्यात येतील. आमचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. उमेदवारांची घोषणा शुक्रवारी केली जाईल.
राम नेवले
विदर्भ निर्माण महामंच, समन्वयक