विदर्भवादी संघटनांनी एकत्र यावे
By admin | Published: January 21, 2016 02:41 AM2016-01-21T02:41:24+5:302016-01-21T02:41:24+5:30
विदर्भवादी संघटनांना एकत्र आणण्यासाठी नवराज्य निर्माण महासंघाने पुढाकार घेतला आहे.
नागपूर : विदर्भवादी संघटनांना एकत्र आणण्यासाठी नवराज्य निर्माण महासंघाने पुढाकार घेतला आहे. माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती चौकातील कार्यालयात झालेल्या बैठकीत यावर सखोल चर्चा करण्यात आली.
वेगळ्या विदर्भासाठी विविध पक्ष व संघटना वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन करीत आहेत. सर्वांचा उद्देश एकच असला तरी ऐक्याचा अभाव आहे. यामुळे आंदोलनाची धार बोथट झाली आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारल्यास त्याचे अनुकूल परिणाम दिसून येतील. त्यासाठी नेतृत्वाचा वाद बाजूला सारून संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
विदर्भाची मागणी जनतेची नसून धनदांडग्यांची आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता आमदार निवासात विदर्भवाद्यांची बैठक होणार आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा तोमर बैठकीला उपस्थित राहतील. महासंघातर्फे विदर्भासह ग्रेटर दिल्ली, हरित प्रदेश, बुंदेलखंड, पूर्वांचल इत्यादी २० राज्यांच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. स्वतंत्र विदर्भासाठी सर्व विदर्भवाद्यांना एका व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. यापूर्वी २००९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर व २०१० च्या सुरुवातीला वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. त्यावेळी समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीतर्फे जेलभरो, विदर्भ बंद, धरणे, निदर्शने इत्यादी आंदोलने करण्यात आली होती. यानंतर काँग्रेस नेत्यांनी माघार घेतली तर, भाजपने वेगळी चूल मांडली. आता परत तसा प्रयोग करण्यात येत असला तरी, भाजप व काँग्रेसच्या सहभागाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. हे प्रमुख पक्ष सोबत आले नाही तरी इतर समविचारी पक्ष व संघटना एकत्र याव्यात यासाठी महासंघाचे नेते कामाला लागले आहेत.
बैठकीत महासंघाचे सरचिटणीस ठाकूर किशोरसिंग बैस, डॉ. गणेश खारकर, विजया धोटे, सुनील चोखारे, डॉ. प्रमोद बनकर, राजेंद्रसिंग राजपूत, अॅड. सिन्हा, सतीश इटकेलवार आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)