विदर्भवादी जाळणार माेदी सरकारचा पुतळा; ७ डिसेंबरला आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 10:25 AM2021-12-05T10:25:11+5:302021-12-05T10:43:35+5:30
२०१४ व पुढे २०१९ असे दाेनदा केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केला. आता तर विदर्भाचा प्रस्तावच प्राप्त न झाल्याचे बाेलले जाणे, म्हणून विदर्भाच्या मागणीला बगल देण्याचा प्रयत्न असल्याचे चटप म्हणाले.
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त झाला नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राॅय यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विदर्भवाद्यांमध्ये असंताेष पसरला आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून येत्या ७ डिसेंबरला विदर्भवादी पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राॅय व केंद्र सरकारचे पुतळे जाळणार असल्याचा इशारा विदर्भ राज्य आंदाेलन समितीचे समन्वय वामनराव चटप यांनी दिला.
शनिवारी आयाेजित पत्रपरिषदेदरम्यान चटप यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र साेडले. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी १९०५ सालापासून केली जात आहे. त्यावेळी मध्यप्रांत व बेरारच्या विधानसभेनेही मान्यता दिली. शासनाने वेळाेवेळी नेमलेल्या दार आयाेग, जे.व्ही.पी. कमिटी, राज्य पुनर्रचना आयाेग, संगमा समितीसह इतर समित्यांनीही विदर्भ सक्षम राज्य हाेईल, असा उल्लेख केला हाेता.
भाजपने १९९७ साली भुवनेश्वर येथील राष्ट्रीय अधिवेशनात ठराव पारित करून विदर्भाची मागणी उचलून धरली. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तत्कालीन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही केंद्रात सरकार आल्यास राज्य देण्याचे लेखी अभिवचन दिले हाेते. २०१४ व पुढे २०१९ असे दाेनदा केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केला. आता तर विदर्भाचा प्रस्तावच प्राप्त न झाल्याचे बाेलले जाणे, म्हणून विदर्भाच्या मागणीला बगल देण्याचा प्रयत्न असल्याचे चटप म्हणाले.
या सरकारचा निषेध म्हणून ७ डिसेंबरला विदर्भातील सर्व जिल्ह्यात निषेध आंदाेलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेत श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, पी.के.बी. चक्रवर्ती, रंजना मामर्डे, विष्णुपंत आष्टीकर, मुकेश मासूरकर, तात्या मत्ते, मितीन भागवत, गुलाबराव धांडे आदी उपस्थित हाेते.