अणेंच्या स्वागतासाठी विदर्भवादी सज्ज

By admin | Published: March 26, 2016 02:43 AM2016-03-26T02:43:11+5:302016-03-26T02:43:11+5:30

ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर महाधिवक्ता पदाचा राजीनामा देऊन आपल्या ...

Vidarbha is ready for ana | अणेंच्या स्वागतासाठी विदर्भवादी सज्ज

अणेंच्या स्वागतासाठी विदर्भवादी सज्ज

Next

आज नागपुरात आगमन : संविधान चौकात भव्य स्वागत
नागपूर : ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर महाधिवक्ता पदाचा राजीनामा देऊन आपल्या नि:स्पृह, नि:संदेह विदर्भ प्रेमाची प्रचिती उभ्या महाराष्ट्राला दिली आहे. राजीनामा देऊन पदमुक्त झाल्यावर अ‍ॅड. श्रीहरी अणे २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता मुंबई नागपूर जेट विमानाने नागपूरला पोहचत आहेत. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे वैदर्भीयांच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.
विमानतळावरील स्वागतानंतर अ‍ॅड. श्रीहरी अणे व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील.
त्यानंतर संविधान चौक येथील संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. संविधान चौक येथे सकाळी १०.३० वाजता अ‍ॅड. श्रीहरी अणे स्वागत समितीच्यावतीने विविध संघटनांतर्फे अ‍ॅड. श्रीहरी अणे यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी होणाऱ्या सभेला अ‍ॅड. अणे संबोधित करतील, असे स्वागत समितीचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ केदार यांनी कळविले आहे.
विविध संघटनांतर्फे स्वागत
अ‍ॅड. श्रीहरी अणे यांचे संविधान चौकात विविध संघटनांकडून स्वागत करण्यात येणार आहे. यामध्ये नवराज्य निर्माण महासंघाचे विदर्भवीर जांबुवंतराव धोटे, विजयाताई धोटे, महासचिव ठाकूर किशोरसिंह बैसे यांच्यासह मुकेश समर्थ - विदर्भ कनेक्ट, प्रदीप मैत्र-पत्रकार संघ, अ‍ॅड. नीरज खांदेवाले, स्वप्नील संन्याल-विदर्भ राज्य आघाडी, संदेश सिंगलकर-विदर्भ माजी सैनिक संघटना, राजकुमार तिरपुडे, वामनराव कोंबाडे- विदर्भ माझा, दिलीप नरवडिया- विदर्भ राज्य आंदोलन समिती, जे.पी. शर्मा-विदर्भ टॅक्सपेअर समिती, अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, डॉ. रवींद्र भुसारी, डॉ. उदय बोधनकर-सहयोग ट्रस्ट, अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी-श्रमिक एल्गार संघटना, राम नेवले-शेतकरी संघटना, प्रमोद पांडे-जनमंच, नितीन चौधरी-ओबीसी संघर्ष समिती आदींसह विदर्भ माजी सैनिक को-आॅपरेटिव्ह संस्था, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, स्टील अ‍ॅण्ड हार्डवेअर चेंबर आॅफ कॉमर्स, नागपूर रेसिडेन्शियल होटल्स असोसिएशन, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल, विदर्भ महिला वकील संघटना, हायकोर्ट बार असोसिएशन, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, विदर्भ आॅटोरिक्षा संघटन फेडरेशन, विदर्भवादी कलाकार व साहित्यिक संघ, किसान अधिकार अभियान, इको-प्रो, चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, एक्स सर्व्हिसमेन वेल्फेयर असोसिएशन, महाराष्ट्र महिला इंटक समिती, नागपूर यंग लॉयर्स असोसिएशन आदी संघटनांतर्फे स्वागत करण्यात येणार आहे.
आता विदर्भ राज्य आंदोलनाचे नेतृत्व करावे
विदर्भाच्या स्वतंत्र राज्याची नितांत गरज आहे. वैदर्भीय जनतेची ती सर्वमान्य संवैधानिक मागणी आहे. ही भावना महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता सुप्रसिद्ध कायदेपंडित व विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलेले मत म्हणजे विदर्भातील जनतेचा विद्रोही हुंकार आहे. विदर्भाच्या स्वाभिमानासाठी अ‍ॅड. अणे यांनी महाधिवक्ता पदाचा दिलेला राजीनामा म्हणजे विदर्भाबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवणाऱ्या विदर्भ राज्य विरोधकांना लावलेली सणसणीत चपराक आहे. अ‍ॅड. अणे यांच्या विरोधात विदर्भ विरोधकांनी केलेला थयथयाट अशोभनीय आहे. अणे यांनी केलेल्या त्यागामुळे विदर्भातील विद्रोहाचे पाणी पेटले असून आता यापुढे अ‍ॅड. अणे यांनी विदर्भ राज्यासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व करावे, असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

स्वतंत्र विदर्भासाठी ३१ मार्चला दिल्लीत धरणे
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ३१ मार्च रोजी जंतरमंतर दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वच विदर्भवादी नेत्यांना सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यापैकी अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्यसह अनेक नेत्यांनी सामील होण्याचे मान्य केले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांचे ११ सदस्यीय शिष्टमंडळ २८ मार्च ते २ एप्रिलपर्यंत दिल्लीमध्ये थांबणार असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग यांना भेटून निवेदन देण्यात येईल, असे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी कळविले आहे.

Web Title: Vidarbha is ready for ana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.