विदर्भ साहित्य संघाचे आयोजन : राज्यस्तरीय साहित्य-संस्कृती महोत्सव यंदा चंद्रपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:35 PM2020-01-22T22:35:21+5:302020-01-22T22:37:13+5:30
विदर्भ साहित्य संघ आणि चांदा क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाचा राज्यस्तरीय साहित्य-संस्कृती महोत्सव यावर्षी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ साहित्य संघ आणि चांदा क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाचा राज्यस्तरीय साहित्य-संस्कृती महोत्सव यावर्षी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवादरम्यान महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील मराठी व हिंदी भाषक जुने जाणते आणि नवोदित लेखक, कवी, वक्ते, अभ्यासक सहभागी होणार आहेत.
चांदा क्लबच्या चांदा मैदानावर येत्या २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी हा महोत्सव होणार असून माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आला आहे. चंद्रपूरला यापूर्वी दोन अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि दोन विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हे महोत्सवाचे स्वागताध्यक्ष असून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे संरक्षक आहेत. चांदा क्लबचे सचिव डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित हे कार्याध्यक्ष तर सुनील देशपांडे कार्यवाह तसेच डॉ. राजीव देवईकर, प्रशांत आर्वे, इरफान शेख यांची सहकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या गोंडवाना शाखेचे अध्यक्ष डॉ. शरद सालफले हे आयोजन समितीचे अध्यक्ष आहेत. वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग आणि सरचिटणीस विलास मानेकर यांच्या मार्गदर्शनात महोत्सवाच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. या महोत्सवासोबत चांदा क्लबतर्फे चार दिवसाच्या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनही होणार असून मराठीसह अन्य भाषांमधील प्रकाशक व पुस्तक विक्रेते यामध्ये सहभागी होणार आहेत. कविसंमेलन, कथाकथन, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रकट मुलाखती, विविध विषयावरील परिसंवाद व सोबत पारंपरिक लोककला आणि सांस्कृतिक-सांगितिक कार्यक्रमांची मेजवानी महोत्सवाच्या माध्यमातून साहित्य व कलारसिकांना मिळणार आहे.