स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भवादी संघटना एकत्र
By admin | Published: February 2, 2016 03:01 AM2016-02-02T03:01:35+5:302016-02-02T03:01:35+5:30
स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला बळ मिळावे व जास्तीतजास्त जनतेचा पाठिंबा मिळावा यासाठी विदर्भवादी संघटनांनी एकत्रित काम करण्याची गरज व्यक्त करण्यात येत होती.
संघटितपणे राबविणार आंदोलन : जनजागृतीवर देणार भर
नागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला बळ मिळावे व जास्तीतजास्त जनतेचा पाठिंबा मिळावा यासाठी विदर्भवादी संघटनांनी एकत्रित काम करण्याची गरज व्यक्त करण्यात येत होती. संघटित प्रयत्नांची आवश्यकता ओळखून विदर्भ प्रदेश विकास परिषद, जनमंच आणि ‘वेद’ (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट) या तीन संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटना यापुढे एकत्रितपणे जनजागृती मोहीम तसेच आंदोलने राबविणार आहेत.
यासंदर्भात तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मेघे, ‘जनमंच’चे अध्यक्ष अॅड.अनिल किलोर तसेच ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र पारेख हे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या संघटनांचे अस्तित्व कायम ठेवून विदर्भाच्या मागणीसाठी एकत्रित काम करण्याच्या प्रस्तावाला यावेळी मान्यता देण्यात आली. आंदोलनाचे कार्यक्रम पुढे चालविण्यासाठी या संस्थांकडून समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात तरुण व नव्या नेतृत्वाला स्थान देण्यात येईल. तसेच ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन मंडळ तयार करण्यात येईल, असे ठरविण्यात आले. वेगळ्या विदर्भासाठी काम करणाऱ्या तीन महत्त्वाच्या संघटना एकत्र आल्यामुळे स्वतंत्र राज्याच्या आंदोलनाला आणखी जोर येण्याची चिन्हे आहेत; शिवाय अनेक मोठे चेहरेदेखील या आंदोलनात जुळण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
जनमत वाढविण्यासाठी प्रयत्न करणार
या तिन्ही संस्था विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विविध मार्गातून प्रयत्न करणार आहेत. यात वेगळ्या विदर्भासाठी जनमत वाढविणे, मतदान घेणे, निवेदन देणे, विविध पातळ्यांवर चर्चा करणे, धरणे आंदोलन, सभा घेणे या उपक्रमांचा समावेश राहील. या आंदोलनामध्ये हिंसेला स्थान राहणार नाही व विधायक मार्गानेच हे आंदोलन करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
समन्वय समितीतून पक्षनिर्मिती नको
वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करता करता संघटना राजकारणात शिरण्याची शक्यतादेखील आहे. ही बाब लक्षात घेऊन या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. समन्वय समिती कोणताही राजकीय पक्ष काढणार नाही. तसेच कोणी जर असा पक्ष काढत असेल तर त्यात समन्वय समिती सहभागी होणार नाही, असे ठरविण्यात आले आहे. शिवाय इतर विदर्भवादी संघटनांना या समन्वय समितीचा विरोध राहणार नाही. वेळ पडली तर त्यांना पाठिंबाच देण्यात येणार आहे.