हत्याकांडाच्या घटनांनी हादरला विदर्भ; सणासुदीच्या तोंडावर रक्तरंजित घटनांचे गालबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 08:30 AM2021-10-14T08:30:00+5:302021-10-14T08:30:02+5:30
Nagpur News गेल्या दोन दिवसात विदर्भ हत्याकांडांच्या घटनांनी हादरून गेला आहे.
यवतमाळ/ वर्धा : गेल्या दोन दिवसात विदर्भ हत्याकांडांच्या घटनांनी हादरून गेला आहे.
यवतमाळसारखा छोट्या शहरात दुहेरी हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे. अहिंसेचा संदेश देणाऱ्या बापूंची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्याची हीच अवस्था आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर रक्तरंजित घटनांचे गालबोट लागले आहे.
यवतमाळात वर्चस्वाच्या लढाईतून यवतमाळ शहरातील आर्णी रोडवर दोघांची हत्या झाली. तर पुसद तालुक्यातील अमृतनगर येथे दारूच्या नशेत मुलानेच वडिलांचा खून केला. या दोन्ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्या. यवतमाळ येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. उमेश येरमे आणि वसीम पठाण यांचा मंगळवारी रात्री धारदार शस्त्राचे घाव घालून खून करण्यात आला. भांडण मिटविण्यासाठी एकत्र आलेल्या सात ते आठ जणांनी आर्णी मार्गावरील एका ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर झालेल्या वादावादीतून दुहेरी हत्याकांडाची घटना घडली.
तर उधारीचे पैसे परत करायचे आहे, त्यासाठी सोयाबीन विकून आलेल्या रकमेतून पैसे द्या म्हणत दारूड्या मुलाने वडिलांसोबत वाद घातला. या वादातूनच वडिलावरच वखराच्या पासीने वार केल्याने मारोती तुकाराम गादेकर या ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनिल गादेकर यास अटक करण्यात आली आहे.
वर्धेतही दोन हत्याकांड
राष्ट्रसंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बापूंच्या जिल्ह्यात सलग दोन दिवसात झालेल्या खुनाच्या घटनांनी जिल्ह्याला हादरा बसला आहे. वर्धा आणि देवळी येथे झालेल्या वृद्धांच्या हत्येच्या घटनांनी दहशत निर्माण झाली आहे.
सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रोटा तलाव परिसरात असलेल्या केनलच्या विहिरीत वसंत हाथमोडे या ६५ वर्षीय व्यक्तीची हत्या करून मृतदेह सिमेंट खांबाला बांधून फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी तपास करीत या प्रकरणात माजी नगराध्यक्षांचे पती भास्कर इथापे यांच्यासह दोघांना अटक केली आहे. न्यायालयात मृतक फितूर होईल आणि शिक्षा लागेल, या भीतीने ही हत्या घडवून आणल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत.
तर देवळी येथील वसंता ढोणे यांची संपत्तीच्या वादातून सव्वा लाख रुपये देऊन त्याच्याच साडभावाने मुलाला सुपारी देऊन हत्याकांड घडवून आणले. या प्रकरणात देवळी पोलिसांनी ७ आरोपीना अटक केली आहे. या दोन्ही घटनांनी अहिंसेची नगरी हिंसक झाल्याची प्रचिती आली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही घटनांचा उलगडा झाला असून, आरोपी पोलीस कोठडीत आहेत.