विदर्भात सर्पदंशाचे मृत्यू वाऱ्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:06 AM2021-06-21T04:06:40+5:302021-06-21T04:06:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भामध्ये मागील साडेचार वर्षामध्ये सुमारे ९,५७० व्यक्तींना सर्पदंश झाला. त्यापैकी शंभरांवर नागरिकांचा मृत्यू झाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भामध्ये मागील साडेचार वर्षामध्ये सुमारे ९,५७० व्यक्तींना सर्पदंश झाला. त्यापैकी शंभरांवर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. साप हा प्राणी वनविभागाच्या शेड्यूलमध्ये आहे. त्याच्या संरक्षणासाठी कायदा असला तरी सर्पदंशाने झालेल्या मृत्यूनंतर संबंधिताच्या कुटुंबीयांना मदतीसाठी वनविभाग किंवा सरकारकडे कसलेही प्रावधान नाही.
सर्पदंशाचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांची एमएलसी (मेडिकल लिगल केस) अशी नोंद होत नाही. ही नोंद घेण्यासंदर्भात डॉक्टरांमध्ये संभ्रम आहे. अपवादात्मक स्थितीतच अशा नोंदी होतात. अशी नोंद न झाल्याने रुग्णांना सर्पदंशावरील उपचार पैसे मोजून करून घ्यावे लागतात. साप हा प्राणी वनविभागाच्या वन्यजीव यादीत आहे. याच यादीत वाघ, बिबट, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे यांचाही समावेश आहे. एवढेच नाही तर गिधाडांनी विणीच्या काळात घरटे बांधलेल्या नारळाच्या झाडांचे नुकसान केल्यास भरपाईची तरतूद आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास १५ लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास किंवा गंभीर जखमी झाल्यास पाच लाख रुपयांची मदत देण्याची तरतूद आहे. जनावरांचा मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या किमतीच्या ७५ टक्के किंवा ६० हजार रुपये यापेक्षा कमी असणारी रक्कम देण्याचीही तरतूद आहे. याच प्राण्यांच्या यादीमध्ये सापांचाही समावेश आहे. मात्र त्यांच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास वनविभागाकडून नुकसानभरपाई मात्र मिळत नाही, तशी तरतूद नसल्याचे सांगितले जाते.
...
शेतकऱ्यांची व्यथा कधी ऐकणार?
पावसाळ्यात शिवारात बिळामध्ये पाणी शिरल्याने साप भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतात. अनेकदा जनावरांना किंवा माणसांना सर्पदंश होण्याच्या आणि जनावरे दगावण्याच्या घटना घडतात. ऐन हंगामात असे घडल्यावर शेतकऱ्यांचा आधारच तुटतो. बैलांअभावी शेतीचा हंगामच पडण्याचे प्रसंग येतात. अशा घटनांची नोंद करूनही नुकसानभरपाई मात्र मिळत नाही.
...
कोट
शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही अनेकदा मांडला आहे. मुख्यमंत्री, वनविभाग आणि स्थानिक प्रशासनालाही निवेदने दिली. तरीही प्रश्न मार्गी लागलेला नाही. साप मारणे हा गुन्हा ठरत असेल तर सर्पदंशानंतर वनविभागाने नुकसानभरपाई द्यायलाच हवी.
- राम नेवले, माजी प्रांताध्यक्ष, शेतकरी संघटना