विदर्भात हव्या ११ नवीन ‘सिट्रस इस्टेट’; सहा जिल्ह्यांमधील १५ तालुक्यांमध्ये संत्रा व माेसंबीचे उत्पादन
By सुनील चरपे | Published: May 20, 2023 08:00 AM2023-05-20T08:00:00+5:302023-05-20T08:00:07+5:30
Nagpur News विदर्भातील संत्रा व माेसंबी बागांचे लागवड क्षेत्र विचारात घेता या तीन सिट्रस इस्टेट ताेकड्या असून, महत्त्वाची कामे करताना सर्वांचीच दमछाक हाेते. त्यामुळे राज्य सरकारने विदर्भात किमान ११ नवीन सिट्रस इस्टेटला मंजुरी द्यायला हवी असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
सुनील चरपे
नागपूर : संत्रा, माेसंबी, लिंबू या फळांच्या दर्जेदार उत्पादनासाठी राज्य सरकारने ७ मार्च २०१९ राेजी विदर्भात तीन व मराठवाड्यात एक अशा चार सिट्रस इस्टेटला मंजुरी दिली. विदर्भातील संत्रा व माेसंबी बागांचे लागवड क्षेत्र विचारात घेता या तीन सिट्रस इस्टेट ताेकड्या असून, महत्त्वाची कामे करताना सर्वांचीच दमछाक हाेते. त्यामुळे राज्य सरकारने विदर्भात किमान ११ नवीन सिट्रस इस्टेटला मंजुरी द्यायला हवी, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
विदर्भात सध्या ढिवरवाडी (ता. काटाेल, जिल्हा नागपूर), उमरखेड (ता. माेर्शी, जिल्हा अमरावती) व तळेगाव (ता. आष्टी, जिल्हा वर्धा) या तीन सिट्रस इस्टेट कार्यरत आहेत. नागपूर जिल्ह्यातील सिस्ट्रस इस्टेटला चार, अमरावती जिल्ह्यातील सिट्रस इस्टेटला पाच आणि वर्धा जिल्ह्यातील सिट्रस इस्टेटला तीन संत्रा व माेसंबी उत्पादक तालुके जाेडली आहेत. अकाेला, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात संत्रा व माेसंबीच्या बागा असताना तिथे एकही सिट्रस इस्टेट नाही.
परिणामी, नर्सरीमध्ये दर्जेदार कलमांची निर्मिती, कृषी निविष्ठांचे वितरण, बागांचे प्रुनिंग, माती, पाणी व पाने परीक्षण, बागांचे पाणी व खत नियाेजन, बागांवरील किडी व राेगांचे व्यवस्थापन, निर्यातक्षम फळांचे उत्पादन, आधुनिक यंत्रसामग्रीचा वेळीच पुरवठा, फळ प्रक्रिया, साठवणूक, मार्केटिंग, निर्यात, उत्पादकांना मार्गदर्शन यासह इतर महत्त्वाच्या बाबी करताना अधिकारी, कर्मचारी व सदस्यांची दमछाक हाेत असून, उत्पादकांना वेळीच सेवा मिळत नसल्याने त्याचा बागा व फळांवर विपरीत परिणाम हाेत आहे.
या तालुक्यात हव्या सिट्रस इस्टेट
महाराष्ट्रातील सिट्रस इस्टेट पंजाबच्या धर्तीवर तयार केल्या आहेत. पंजाबात १० हजार हेक्टरमधील किन्नाे संत्र्याला एक सिट्रस इस्टेट आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड, कळमेश्वर व सावनेर, अमरावती जिल्ह्यातील वरूड, चांदूरबाजार, अचलपूर (परतवाडा) व तिवसा, वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), अकाेला जिल्ह्यातील अकाेट, वाशीम जिल्ह्यातील वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर या ठिकाणी नवीन सिट्रस इस्टेट निर्माण करणे आवश्यक आहे. यातील नरखेड व अचलपूर (परतवाडा) सिट्रस इस्टेटचे प्रस्ताव राज्य सरकारकडे निर्णयाधीन आहेत.
शासन दप्तरी विदर्भातील संत्र्याचे लागवड क्षेत्र १ लाख १० हजार हेक्टर व माेसंबीचे लागवड क्षेत्र १२,६५५ हेक्टर दाखविण्यात आले असले तरी हे लागवड क्षेत्र १ लाख ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. तालुकानिहाय सिट्रस इस्टेट तयार केल्यास सर्व कामे साेपे हाेऊन कामांचा ताण कमी हाेईल. अधिकाऱ्यांना आधीच खूप कामे असतात. त्यामुळे निर्णय व अंमलबजावणीला वेळ लागताे. या सर्व सिट्रस इस्टेटमध्ये समन्वय ठेवण्यासाठी वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट सारखी प्रभावी नाेडल एजन्सी असायला हवी.
- श्रीधर ठाकरे,
कार्यकारी संचालक, महाऑरेंज.