तापमान राेखले नाही तर विदर्भाची ‘डेथ व्हॅली’ हाेईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2023 09:46 PM2023-03-18T21:46:17+5:302023-03-18T21:46:50+5:30
Nagpur News तापमान वाढ राेखली नाही तर भविष्यात विदर्भाचीही ‘डेथ व्हॅली’ हाेईल, असा इशारा हवामान तज्ज्ञ व ग्रीन प्लॅनेट साेसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चाेपणे यांनी दिला.
नागपूर : विदर्भाच्या तापमानात सातत्याने वाढ हाेत आहे. मागील दशकभरात पारा उच्चांकीवर गेला आहे. २००७ मध्ये चंद्रपूरचा पारा ४९ डिग्रीवर पाेहचला हाेता. २०१६ हे सर्वात उष्ण वर्ष ठरले तर २०२२ मध्ये सर्वाधिक उष्ण लहरींचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी विदर्भातील पाच शहरांचे तापमान जागतिक क्रमवारीत हाेते. तापमान वाढ राेखली नाही तर भविष्यात विदर्भाचीही ‘डेथ व्हॅली’ हाेईल, असा इशारा हवामान तज्ज्ञ व ग्रीन प्लॅनेट साेसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चाेपणे यांनी दिला.
वनराई फाउंडेशनच्या वतीने ‘विदर्भातील तापमानवाढ’ विषयावर प्रा. चाेपणे यांचे व्याख्यान आयाेजित करण्यात आले. याप्रसंगी वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, अजय पाटील, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे महेश बंग प्रामुख्याने उपस्थित हाेते. प्रा. चाेपणे म्हणाले, प्रचंड प्रमाणात झालेली जंगलताेड, अनियंत्रित औद्याेगिकरण, अमर्याद प्रदूषण यामुळे झालेली तापमान वाढ आणि हवामान बदल भविष्यातील गंभीर धाेक्यांकडे नेणारे आहे. वारंवार येणारे महापूर, उष्णतेच्या लाटा हे त्याचे परिणाम आहेत. तापमान वाढीमुळे काही वर्षांत भयावह समस्यांचा सामना करावा लागणार आहे. पृथ्वीकडून विनाशाच्या सूचना वारंवार मिळत आहेत, पण आपण सातत्याने दुर्लक्ष करीत आहाेत. प्रा. चाेपणे यांनी तापमान माेजण्याचे मानके, ब्रिटिश काळातील पारा माेजण्याची पद्धत, तापमान वाढीची कारणे व १०० वर्षांचा अभ्यासाचा अहवाल यावेळी मांडला. संचालन नितीन जतकर यांनी केले. वनराईचे सचिव नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.