विदर्भाचा निर्णय घ्यावाच लागेल
By admin | Published: May 15, 2016 02:41 AM2016-05-15T02:41:39+5:302016-05-15T02:41:39+5:30
काँग्रेसचा विदर्भाच्या मागणीला विरोध नाही. पण विदर्भ विकसित हवा की अविकसित याचाही विचार होणे आवश्यक आहे.
अविनाश पांडे : तमाशातून विदर्भ मिळणार नाही
नागपूर : काँग्रेसचा विदर्भाच्या मागणीला विरोध नाही. पण विदर्भ विकसित हवा की अविकसित याचाही विचार होणे आवश्यक आहे. आज ना उद्या छोट्या राज्यांकडे जावे लागेल. अर्थातच विदर्भाचाही निर्णय घ्यावाच लागेल, असे मत अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव खासदार अविनाश पांडे यांनी शनिवारी केले. टिळक पत्रकार भवन येथे आयोजित ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसंदर्भात विदर्भातील लोकांच्या भावनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तमाशातून विदर्भ मिळणार नाही. याबाबत सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. शिक्षण, उद्योगासोबतच विकासाचा कालावधी निर्धारित करावा लागेल. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यापासून मिळणारा महसूल व विदर्भातून प्राप्त होणारे उत्पन्न याचाही विचार होणे गरजेचे आहे. भाजपने जाहीरनाम्यात विदर्भाचे आश्वासन दिले होेते. परंतु गेल्या दोन वर्षात त्यांनी या दृष्टीने कोणती पाऊ ले उचलली, असा सवाल त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात केला.
४ जुलैला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत आहे. पक्षश्रेष्ठींनी पक्षसंघटनेची सोपविलेली जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न केला. आसाम, राजस्थान, गुजरात, त्रिपुरा, कर्नाटक या राज्यातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सांभाळण्याची संधी पक्षाने दिली. सर्वसामान्यांच्या हिताची कामे करण्याचा प्रयत्न केला. सहा वर्षात ३२ कोटींच्या खासदार निधीपैकी २० कोटी महाराष्ट्रातील शहरी भागासाठी तर १२ कोटी ग्रामीण भागाच्या विकासासाठी वापरलेले आहे. हा निधी जनहिताच्या कामावर खर्च के ल्याची माहिती पांडे यांनी दिली. जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी वेळोवेळी संसदेच्या व्यासपीठाचा वापर केला. यात नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रूपांतरण प्रकल्प, नागनदीचे पुनरुज्जीवन, नागपूर मेट्रो आदी जिव्हाळ्याच्या विषयाचा समावेश होता. महिला, शिक्षण, नैसर्गिक आपत्ती, कृषी, क्रीडा, पर्यावरण,आरोग्य, शहरी व ग्रामीण विकास, जलसंधारण, रस्ते, पूल व भवन अशा विविध क्षेत्रातील समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, जोसेफ राव, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, दीपक पटेल, प्रदेश काँग्रेसचे सचिव रवींद्र दरेकर, नितीन कुंभलकर, किशोर जिचकार, प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फिटनेस मुव्हमेंट
‘हेल्थ इज वेल्थ’ या उक्तीनुसार नागपूर शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. त्यांना विविध आजारांवर मात करता यावी, यासाठी नागपूर फिटनेस मुव्हमेन्टच्या माध्यमातून शहरातील ७९ उद्यानात ग्रीन जीमची व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी उद्यानात व्यायामाची साधने उपलब्ध करण्यासाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध केला असून देखभाल करण्याची जबाबदारी महापालिका व नासुप्रने स्वीकारली असल्याचे पांडे यांनी सांगितले.