‘एलजीबीटीक्यू’साठी विदर्भातले पहिले नि:शुल्क क्लिनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 08:10 AM2022-12-06T08:10:00+5:302022-12-06T08:10:06+5:30
Nagpur News एलजीबीटीक्यू नागरिकांसाठी विदर्भातले पहिले स्वतंत्र व नि:शुल्क क्लिनिक सोमवारी नागपुरात सुरू करण्यात आले.
नागपूर : एलजीबीटीक्यू नागरिकांसाठी विदर्भातले पहिले स्वतंत्र व नि:शुल्क क्लिनिक सोमवारी नागपुरात सुरू करण्यात आले. यात समुदायातील पाच हजारांहून अधिक नागरिकांना सर्वसाधारण आजारासह एचआयव्हीसाठीही विनामूल्य वैद्यकीय सल्ला व उपचार केले जातील.
सारथी ट्रस्ट व हमसफर ट्रस्टच्या पुढाकाराने हे क्लिनिक सुरू करण्यात आले असून, ते मोहननगर येथील सारथीच्या कार्यालयालगत आहे. या क्लिनिकमध्ये, डॉक्टर, समुपदेशक, आहारतज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदी स्टाफ राहणार आहे. विदभार्तील एलजीबीटीक्यू नागरिकांना या क्लिनिकचा लाभ घेता येईल. या क्लिनिकचे उद्घाटन डॉ. काजल मित्रा व डॉ. मुरुगेश सुब्रमण्यम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्या कांबळे, मोहनी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारथी ट्रस्टचे निकुंज जोशी यांनी केले, तर आभार आनंद चंद्राणी यांनी मानले.
-आता उपेक्षिताची वागणूक मिळणार नाही
‘ट्रान्सवुमन’ अंशुल शर्मा यांनी सांगितले, कुठल्याही आजाराकरिता आतापर्यंत डॉक्टरांकडे गेल्यावर आम्हाला उपेक्षित व कधीकधी तर अपमानाची वागणूक मिळायची. बराच वेळ ताटकळत रहावे लागायचे. सहयोग या नव्या क्लिनिकमुळे आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळेल व आम्हाला योग्य उपचार मिळतील.