विदर्भाचा पँथर काळाचा पडद्याआड; बबन लव्हात्रे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 09:47 PM2020-08-19T21:47:41+5:302020-08-19T22:00:21+5:30
दलित पँथरचे नेते, दिवंगत राजा ढाले यांचे निकटचे सहकारी, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक बबन लव्हात्रे यांचे बुधवारी निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शोषित वंचितांसाठी लढणारी लढवय्यी संघटना म्हणजे दलित पँथर. एकेकाळी अन्याय, अत्याचार करणाऱ्यांमध्ये दलित पँथरने आपला एक धाक निर्माण केला होता. ही लढवय्यी संघटना विदर्भात रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे दलित पँथरचे नेते, दिवंगत राजा ढाले यांचे निकटचे सहकारी, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक बबन लव्हात्रे यांचे बुधवारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलं, मुली व मोठा परिवार आहे.
बबन लव्हात्रे हे दलित पँथरच्या संस्थापक कार्यकर्त्यांपैकी एक होते. विदर्भात पँथरची बांधणी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. विदर्भातील दलित पँथरचा इतिहास त्यांनी शब्दरुपातही मांडला आहे. ते खºया अर्थाने लढवय्ये कार्यकर्ते होते. नामांतराचा लढा, बौद्ध कायदा, सुशिक्षित बेरोजगार आदींच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलने केली. तुरुगंवासही भोगला. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. संशोधनपर लिखाणांवर त्यांचा अधिक भर राहिला आहे. ‘पूर्व विदर्भातील अविकसित निरक्षर जनता’, बुद्ध तत्त्वज्ञानी कबीर, विदर्भ राज्याचे खच्चीकरण, जग्गनाथपुरी हे प्राचीन बौद्ध क्षेत्र, नागपूर विद्यापीठ घोटाळा आदी त्यांची महत्त्वाची पुस्तके गाजली आहेत. उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता वैशालीनगर येथील घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.