इनोव्हेशनमुळे दूर होईल विदर्भाची गरीबी : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 07:46 PM2019-08-24T19:46:43+5:302019-08-24T19:48:33+5:30
इनोव्हेशनमुळेच विदर्भातील गरीबी दूर होउ शकेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भाचा प्रदेश नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न आहे. जंगलातील, शेतीतील उत्पादनावर संशोधन करण्याची गरज आहे. या क्षेत्रात नवनवीन संकल्पनांमधून इनोव्हेशन केल्यास शेतकरी, आदिवासींना लाभ मिळेल आणि हजारो तरुणांना रोजगारही मिळेल. इनोव्हेशनमुळेच विदर्भातील गरीबी दूर होउ शकेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
नागपूर महानगरपालिका व मेयर इनोव्हेशन कॉन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे आयोजित ‘इनोव्हेशन पर्व २०१९’ अंतर्गत ‘नागपूर स्टार्टअप फेस्ट’चे नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी इनोव्हेशन डायरेक्टर मोहीत गंभीर, मराठी चित्रपट अभिनेता संदीप कुळकर्णी, भारत गणेशपुरे, गीतकार संदीप नाथ तसेच मनपा आयुक्त अभिजित बांगर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपा विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, केतन मोहीतकर, चेत जैन, नगरसेविका गार्गी चोपडा आदी उपस्थित होते.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात मिळणाऱ्या मोह, बांबू, रतनजोत, करंज आदींपासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती होण्याची शक्यता असून त्यावर प्रयोग सुरू आहेत. भंडारा, चंद्रपूर भागात धानकटाईनंतर निघणारी तणस तसेच नॅपीयर गवत आणि नागपुरात मटन मार्केट व भाजी बाजारातून निघणाºया टाकाउ पदार्थापासून मोठ्या प्रमाणात ‘बॉयो-सीएनजी’ तयार करण्याचा प्रयोग वेगात सुरू आहे. हे सीएनजी पेट्रोल-डिझेलसाठी पर्याय ठरणारा आहे. या सीएनजीवर महापालिकेच्या बसेस, ट्रक आणि विमाने चालविण्याचा प्रयोग यशस्वीपणे पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात इथेनॉल व बॉयोसीएनजीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू होणार असून येत्या ५ वर्षात पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे डिझेलमुक्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि पाच वर्षात ५० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी संत्रा बर्फीचा प्रयोग, उसाच्या टाकाऊ पदार्थापासून साबण, लघवीपासून युरिया खत बनविण्यासह अनेक संकल्पनांची यादीच सांगितली. आपल्याकडे गुणवत्ता, पैसा व तंत्रज्ञानाचीही कमी नाही, कमतरता आहे केवळ आत्मविश्वासाची. गुणवत्ता, क्षमता व कौशल्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे बॉयोसीएनजी प्रकल्प साकारला जात असून मनपाच्या ३५० बसेस, १५० ट्रक येत्या ३ महिन्यात संचालित करण्यात येणार असून यातून मनपाचे वर्षाला ६० कोटी रुपये वाचतील, अशी माहिती त्यांनी दिली.