विदर्भातील ‘रेड अलर्ट’ची हवा निघाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:25 AM2019-05-20T10:25:58+5:302019-05-20T10:26:20+5:30
हवामान विभागाने २१ व २२ मे रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ चा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातूनही अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु रविवारीच यासंबंधीच्या अलर्टची सूचना वेबसाईटवरून हटवण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान विभागाने २१ व २२ मे रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ चा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातूनही अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु रविवारीच यासंबंधीच्या अलर्टची सूचना वेबसाईटवरून हटवण्यात आली आहे. हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरण्याचे प्रकार प्रत्येक मोसमात पाहायला मिळतात. उन्हाळ्यातही योग्य अंदाज वर्तविण्यात विभाग अपयशी ठरत आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टचा इशारा हवामान विभागातर्फे जारी करण्यात आला होता. जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्त कार्यालयाकडूनही संबंधित अलर्टच्या आधारावर सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मनपाला ‘हीट अॅक्शन प्लॅन’ प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. परंतु आकाशात दाटून आलेल्या ढगांमुळे हवामान विभागाचा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. रविवारी डेली वेदर रिपोर्टच्या कॉलममध्ये रेड अलर्टसोबतच आॅरेंज अलर्टचा इशाराही हटवण्यात आलेला आहे. केवळ ‘हीट वेव्ह’ उष्णतेची लाटचा इशारा दिला जात आहे. नागपूरमध्ये असा अंदाज वर्तविला जात आहे की, येणाऱ्या तीन दिवसात तापमान ४५ ते ४६ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. परंतु नागपुरात कमाल तापमान ४३ ते ४४ डिग्री दरम्यान सुरु आहे. रविवारी कमाल (जास्तीत जास्त) तापमान ४४.१ डिग्री सेल्सिअस होते तर रात्रीचे तापमान गेल्या २४ तासात ४.७ डिग्री सेल्सिअस खाली येऊन २८ डिग्री सेल्सिअसपर्यंत आले आहे.
चंद्रपूर राहिले सर्वात उष्ण
मागील काही दिवसात विदर्भात चंद्रपूर जिल्हा सर्वात जास्त उष्ण राहिला, रविवारीसुद्धा विदर्भात चंद्रपूर जिल्हाच सर्वात जास्त उष्ण राहिला. येथे कमाल तपामान ४५.६ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. ब्रह्मपुरी येथे ४५.५ डिग्री सेल्सिअस तापमान राहिले. वर्धा ४४.५, अकोला ४३.८, अमरावती ४३.६, गडचिरोली ४३.४, गोंदियामध्ये ४३, वाशिम-यवतमाळमध्ये ४२.८, बुलडाणामध्ये ४०.७ डिग्री सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ डिग्री सेल्सिअसने जास्त आहे.