विदर्भाचा समृद्ध वारसा उदासीनतेमुळे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:10 AM2021-01-16T04:10:30+5:302021-01-16T04:10:30+5:30
नागपूर : देशातील महान राजवटींपैकी वाकाटकाचा समृद्ध इतिहास विदर्भाच्या भूमीत दडलेला आहे. कालिदासांची सांस्कृतिक परंपरा येथेच हाेती. आकाेट, पुसद, ...
नागपूर : देशातील महान राजवटींपैकी वाकाटकाचा समृद्ध इतिहास विदर्भाच्या भूमीत दडलेला आहे. कालिदासांची सांस्कृतिक परंपरा येथेच हाेती. आकाेट, पुसद, नगरधन ते रामटेकच्या नागार्जुन टेकडीपर्यंतचा वारसा आपल्याकडे आहे; मात्र सरकार आणि सामाजिक उदासीनतेमुळे संशाेधनाला प्राेत्साहनच मिळत नसल्याने या समृद्ध वारशांचा बराच ऐतिहासिक इतिहास अंधारातच दडलेला असल्याची खंत प्रसिद्ध पुरातत्त्व संशाेधन डाॅ. चंद्रशेखर गुप्त यांनी व्यक्त केली.
विदर्भ संशाेधन मंडळाच्या ८८ व्या स्थापना दिनानिमित्त मंडळाच्या डाॅ. मिराशी सभागृहात डाॅ. गुप्त यांच्या विशेष व्याख्यानाचे आयाेजन करण्यात आले. विदर्भाच्या रायाने घडविला अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १० चा दर्शनी भाग, या त्यांच्या संशाेधनात्मक विषयावर विस्तृतपणे प्रकाश टाकला. अकाेल्याजवळच्या आकाेट येथे २००० वर्षांपूर्वी वास्तव्यास असलेल्या कटाहदिनाे या राजानेच लेणी क्रमांक १० चे प्रवेशद्वार बांधल्याचा दावा त्यांनी केला. ही माहिती मिळविताना आलेल्या अडचणीबाबत त्यांनी सांगितले. अनेक वर्ष पुरातत्त्व संशाेधकासाठी हे आव्हान हाेते आणि हे आव्हान आकाेटमध्ये येऊन संपले. मात्र गुजरातच्या अहमदाबादमधील एका व्यापाऱ्याकडून मिळालेल्या नाण्याचा शाेध घेत औरंगाबाद व पुढे आकाेटपर्यंतचा प्रवास गुंतागुंतीचा हाेता, असेही त्यांनी सांगितले.
खरंतर आकाेट हे एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि अनेक गाेष्टी या मातीत दडल्या आहेत. यवतमाळजवळचे पुसद हेही ठिकाण इतिहासाने भरलेले आहे. रामटेकजवळ नागार्जुन टेकडीचे सविस्तर उत्खनन केले तर नागार्जुनांच्या आयुर्वेद परंपरेचे भंडार खुले हाेऊ शकते. वाकाटक राजवटीचा बराच इतिहास बाहेर येणे बाकी आहे. सातवाहन राजवटीचे तारही विदर्भाशी जुळतात. छत्तीसगडमध्ये मिळालेल्या एका ताम्रपटावर विदर्भ असा उल्लेख सापडला हाेता. हा सर्व दडलेला इतिहास उत्खनन व संशाेधन केल्यावरच बाहेर येणे शक्य आहे; मात्र संशाेधनासाठी कुणाचेही सहकार्य मिळत नसल्याने ताे दडलेलाच असल्याची अशी खंत डाॅ. गुप्त यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन व नियाेजन मंडळाचे व्यवस्थापक डाॅ. शेषशयन देशमुख यांनी केले.
सरकारची मदत, ना प्रायाेजक
डाॅ. शेषशयन देशमुख म्हणाले, पुणे, मुंबईत पुरातत्त्व व ऐतिहासिक संशाेधनासाठी अनेक उद्याेजक प्रायाेजक म्हणून पुढे येत असतात. सरकारचीही भरीव मदत मिळते. विदर्भातील संशाेधनाबाबत मात्र प्रचंड उदासीनता आहे. या मंडळाला कधीकाळी वसंतदादा पाटील, निलंगेकर पाटील, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक अशा मुख्यमंत्र्यांनी भेटी देऊन मदतीचा विश्वास दिला हाेता. दुर्दैवाने असा उदारपणा आता काेणताच मुख्यमंत्री दाखवत नाही. मंडळाच्या कामासाठी निधीही मिळत नाही. काही दानदात्यांच्या भरवशावर मंडळाचा डाेलारा उभा आहे. अशाने संशाेधन करणे कसे शक्य आहे, अशी व्यथा डाॅ. देशमुख यांनी व्यक्त केली.