‘सी प्लेन’ची फेरी, घडविणार विदर्भाची वारी
By admin | Published: January 23, 2017 01:38 AM2017-01-23T01:38:46+5:302017-01-23T01:38:46+5:30
विदर्भाच्या भूमीत असलेली वनसंपदा, जलाशये यासह धार्मिक स्थळांना कमी वेळात भेटी देता याव्यात,
नासुप्र तयार करतेय प्रस्ताव : महाराष्ट्र सागरी मंडळाची मदत
कमलेश वानखेडे नागपूर
विदर्भाच्या भूमीत असलेली वनसंपदा, जलाशये यासह धार्मिक स्थळांना कमी वेळात भेटी देता याव्यात, येथील पर्यटनाला चालना मिळावी, दुर्गम भागात काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांसह नक्षलप्रभावित भागात तैनात असलेल्या जवानांनाही त्वरित नागपुरात पोहचता यावे अशा अनेक उद्देशांच्या पूर्तीसाठी नागपुरातून ‘सी प्लेन’ सुरू करण्याचा प्रस्ताव नागपूर सुधार प्रन्यास तयार करीत आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ यासाठी मदत करीत असून, लवकरच या प्रस्तावाला अंतिम रूप मिळण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र सागरी मंडळांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष आहेत. नागपूरच्या या दोन्ही नेत्यांनी विदर्भाच्या विकासासाठी ‘सी प्लेन’च्या प्रस्तावाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे व नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर या प्रकल्पावर काम करीत आहेत.
सागरी मंडळाने सी प्लेन पाण्यात उतरविण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, सिक्युरिटी टर्मिनल आदींची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
सोबतच प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणकोणत्या बाबींचा यात समावेश करता येईल, याचा अंतिम प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. खासगी कंपनीने सी प्लेन सुरू केले तर प्रवाशांना ते महागात पडू शकते. त्यामुळे नासुप्रने भाडेतत्त्वावर सी प्लेन घेऊन स्वत: संचालन करता येईल का, याची शक्यताही पडताळून पाहिली जात आहे.
फॉरेस्ट टुरिझमसाठी उत्तम पर्याय
नागपूर जिल्ह्यातील खिंडसी, पेंच यासह ताडोबा, नवेगाव, नागझिरा, बोरधरण या स्थळांना जोडणाऱ्या सी प्लेनच्या फेरी नागपुरातून सुरू केल्या तर येथील पर्यटनाला चालना मिळेल. देशभरातून ताडोबा येथे व्याघ्र दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना याचा विशेष फायदा होईल.
नागपूर- शेगाव- शिर्डी धार्मिक पर्यटनाचा प्रस्ताव
नागपूरहून शेगांव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शेगावला गेलेले भाविक तेथून पुढे शिर्डीला जातात. त्यामुळे नागपूर- शेगांव- शिर्डी अशी सी प्लेनची फेरी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. नागपूरच्या अंबाझरी तलावातून सी प्लेन उडेल. शेगावच्या तलावात उतरेल. तेथून शिर्डीच्या विमानतळावर उतरेल. याच विमानाने शिर्डीहून थेट नागपुरात परत येता येईल. या फेरीला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
गडचिरोली, चंद्रपुरातील अधिकाऱ्यांना सोयीचे
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या अंतर्गत भागात काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना विविध शासकीय बैठकांसाठी नागपुरात यावे लागते. मुंबईला जावे लागते. अहेरी, सिरोंचा यासारख्या भागाचे नागपूर पासूनचे अंतर तर ३०० किमीपेक्षा जास्त पडते. वरिष्ठ अधिकारी नागपुरात येताना शासकीय वाहन, चालक, शिपाई घेऊन सोबत येतात. यावर बराच खर्च येतो. शिवाय बराच वेळ जातो. सी प्लेन सेवा सुरू झाली तर या अधिकाऱ्यांनाही याचा वापर करून कमी वेळात नागपूरला पोहचता येईल. त्यामुळे दुर्गम भागातील अधिकाऱ्यांना सी प्लेनचा वापर करण्यासाठी शासकीय अनुदान देता येईल का, याचाही प्रस्तावात विचार केला जात आहे.
खासगी कंपन्यांनानाही उपयोगी
राजुरा, कोरपना, जीवती भागात सिमेंट प्लांट आहेत. नागपूरहून या शहरांचे अंतर २५० ते ३०० किमी आहे. बल्लारशा पेपर मिल, सेंट्रल थर्मल पॉवर स्टेशन, डब्ल्यूसीएलचे कार्यालय आहे. या मोठ्या कंपन्यांचे अधिकारी बहुतांश वेळी नागपुरात येण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करतात. संबंधित कंपन्यांनी सी प्लेनमध्ये काही सीट बुक केल्या तर त्यांचाही खर्च वाचेल सोबत सी प्लेनलाही आर्थिक सक्षमता येऊ शकते. याचा विचार करून प्रस्ताव तयार केला जात आहे.