विदर्भवादी करणार शक्तिप्रदर्शन; शनिवारी जाहीर सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:25 AM2019-02-04T11:25:51+5:302019-02-04T11:26:55+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या विविध राजकीय पक्ष व संघटनांनी येणारी निवडणूक ही विदर्भाच्या प्रश्नावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विदर्भ निर्माण महामंच स्थापन करण्यात आला आहे. या महामंचची पहिली जाहीर सभा येत्या ९ फेब्रुवारी रोजी संविधान चौक येथे होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या विविध राजकीय पक्ष व संघटनांनी येणारी निवडणूक ही विदर्भाच्या प्रश्नावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विदर्भ निर्माण महामंच स्थापन करण्यात आला आहे. या महामंचची पहिली जाहीर सभा येत्या ९ फेब्रुवारी रोजी संविधान चौक येथे होणार आहे. ही सभा म्हणजे विदर्भवाद्यांचे निवडणुकीपूर्वीचे शक्तिप्रदर्शन राहणार असल्याची चर्चा आहे.
विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, प्रहार जनशक्ती पक्ष, आम आदमी पार्टी, बीआरएसपी, रिपब्लिकन पार्टी (खोरिप), प्रोऊटिस्ट ब्लॉक इंडिया, विदर्भ राज्य आंदोलन समिती, नाग विदर्भ आंदोलन समिती, जांबुवंतराव धोटे विचार मंच, नॅशनल फेडरेशन फॉर न्यू स्टेट्स या संघटना व राजकीय पक्षांचा विदर्भ निर्माण महामंचमध्ये सहभाग आहे. उपरोक्त पक्षाच्या सर्व प्रमुखांनी एकत्र येऊन येणारी निवडणूक ही स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वी शक्तिप्रदर्शन करण्याच्या उद्देशाने संविधान चौकात जाहीर सभा घेण्यात येत अहे. या जाहीर सभेला माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे, आ. बच्चू कडू, राजकुमार तिरपुडे, राजेश काकडे, देवेंद्र वानखेडे, अॅड. सुरेश माने, माजी आमदार उपेंद्र शेंडे, माजी आमदार वामनराव चटप, अहमद कादर, सुनील चोखारे, अॅड. स्वप्नजित संन्याल प्रामुख्याने उपस्थित
राहणार आहेत.