विदर्भवादी अरविंद देशमुख यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:53 PM2019-03-18T23:53:30+5:302019-03-18T23:54:35+5:30
विदर्भ आंदोलनातील ज्येष्ठ नेते व विदर्भ राज्य आंदोलन समिती कोर कमिटीचे सदस्य अरविंद देशमुख यांचे त्यांच्या रामदासपेठ येथील निवासस्थानी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची मुलगी हॅन्डबॉल खेळात छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ आंदोलनातील ज्येष्ठ नेते व विदर्भ राज्य आंदोलन समिती कोर कमिटीचे सदस्य अरविंद देशमुख यांचे त्यांच्या रामदासपेठ येथील निवासस्थानी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची मुलगी हॅन्डबॉल खेळात छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू आहे.
मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी अरविंद देशमुख कळमेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक व पुढे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. शेती, शेतकरी व राजकारणाचे अभ्यासक असलेल्या देशमुख यांचा विदर्भ राज्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग होता व त्यासाठी शेवटपर्यंत त्यांनी निष्ठेने कार्य केले. शेतकऱ्यांच्या चळवळीतही त्यांची सक्रियता राहिली आहे. एक प्रभावी वक्ता व कवी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्यात कायम उत्साह भरला असायचा व चेहऱ्यावरच्या हास्याने ते इतरांनाही ऊर्जा देत राहायचे, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विदर्भवादी नेते, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विदर्भ आंदोलनाचा खंदा पुरस्कर्ता गमावल्याची भावना मान्यवरांनी श्रद्धांजली देताना व्यक्त केली.