विदर्भवादी एकजूट, निवडणुका लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:51 PM2018-11-28T22:51:12+5:302018-11-28T22:53:08+5:30

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आजवर विविध आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढणारे विदर्भवादी पक्ष व संघटना आता एकजूट होऊन निवडणुका (बॅलेटची लढाई) लढणार आहेत. यासाठी विदर्भ निर्माण महामंच स्थापन करण्यात आला असून, या मंचच्या माध्यमातून निवडणुका लढविण्यात येतील, अशी घोषणा माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, विदर्भ राज्य आघाडीचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप आणि विदर्भ माझाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी बुधवारी नागपुरात आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत केली.

Vidarbhawadi united, contesting elections | विदर्भवादी एकजूट, निवडणुका लढणार

विदर्भवादी एकजूट, निवडणुका लढणार

Next
ठळक मुद्देविदर्भ निर्माण महामंच स्थापन : नागपुरात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आजवर विविध आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढणारे विदर्भवादी पक्ष व संघटना आता एकजूट होऊन निवडणुका (बॅलेटची लढाई) लढणार आहेत. यासाठी विदर्भ निर्माण महामंच स्थापन करण्यात आला असून, या मंचच्या माध्यमातून निवडणुका लढविण्यात येतील, अशी घोषणा माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, विदर्भ राज्य आघाडीचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप आणि विदर्भ माझाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी बुधवारी नागपुरात आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत केली. 


विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी), शेतकरी संघटना, बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, नाग विदर्भ आंदोलन समिती, राष्ट्रीय जन सुराज्य पार्टी, आरपीआय (खोब्रागडे), जांबुवंतराव धोटे विचार मंच आदी विदर्भातील विविध विदर्भवादी पक्ष, विदर्भवादी संघटना यांचे नेते व त्यांचे प्रतिनिधी यांची दोन दिवसीय संयुक्त बैठक रविभवन येथे पार पडली. या सर्वांनी एकत्र येऊन येत्या निवडणुका लढविण्याचे ठरविले असून, त्यासाठी ‘विदर्भ निर्माण महामंच’स्थापन करण्यात आला. सर्वच संघटनांचे व पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार असून, विदर्भ राज्य निर्माण हे एकच लक्ष्य ठरविण्यात आले असून, संकल्प विदर्भ निर्मितीचा हे घोषवाक्य घेऊन विदर्भ निर्माण महामंच या नावाखाली निवडणुकी लढविण्यात येतील. विदर्भातील सर्व विधानसभा व लोकसभेच्या जागा लढविण्यात येणार आहेत. तरुणांना जास्तीत जास्त उमेदवारी देण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पत्रपरिषदेला रिपाइं खोब्रागडेचे अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे, विदर्भ राज्य आघाडीचे अ‍ॅड. स्वप्नजित संन्याल, नीरज खांदेवाले, श्रीकांत तराळ, अनिल जवादे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, डॉ. रमेश गजबे, रंजना मामर्डे, आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे, जगजित सिंह, बीआरएसपीचे रमेश जनबंधू, विदर्भ माझाचे मंगेश तेलंग, राष्ट्रीय जन सुराज्य पार्टीचे राजेश काकडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे रूपेश फुंड उपस्थित होते.
विदर्भस्तरीय समन्वयक व प्रवक्तेही जाहीर
यावेळी विदर्भ निर्माण महामंचचे समन्वयक म्हणून राम नेवले, श्रीकांत तराळ, महेश तेलंग आणि देवेंद्र वानखेडे यांची निवड करण्यात आली. हे समन्वयकच महामंचचे अधिकृत प्रवक्तेही राहतील.
निवडणुकीसाठी विदर्भवाद्यांचा ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’
७ डिसेंबरला ठरणार जाहीरनामा : शेतकरी आत्महत्या रोखणे व रोजगार राहणार प्रमुख मुद्दे
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला असून यासाठी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरविण्यात येणार आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी पुन्हा एक बैठक बोलावण्यात आली असून त्यात निवडणुकीचा जाहीरनामा ठरविण्यात येणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
संकल्प विदर्भ निर्मितीचा हे विदर्भ निर्माण महामंचाचे घोषवाक्यच आहे. विदर्भातील सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य होय. त्यासोबत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, शेतीमालाला रास्त हमी भाव मिळणे, शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणे, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यासोबतच विदर्भातील तरुणांना विदर्भातच रोजगार कसे उपलब्ध होतील, असे औद्योगिक धोरण राबविणे आदी विषय हे जाहीरनाम्यात राहणार आहे.
भाजप-काँग्रेस दोघेही विदर्भाचे शत्रू
शिवसेनेचा विदर्भाला सुरुवातीपासूनच विरोध आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला विदर्भ द्यायचा नाही आणि भाजपाने आश्वासन देऊनही ते पाळलेले नाही. त्यामुळे ते दोन्ही विदर्भाचे विरोधी आहेत. विदर्भातील ९९ टक्के जनतेला विदर्भ हवा आहे, अशा वेळी त्यांना एक पर्याय हवा आहे. तेव्हा आम्ही त्यांना एक सक्षम पर्याय उभा करणार आहोत, असे राजकुमार तिरपुडे यांनी सांगितले. तर काँग्रेस-भाजपाला मदत होऊ नये म्हणून विश्वसनीय पर्यायी राजकीय दबावगट म्हणून हा महामंच काम करेल, असे श्रीहरी अणे यांनी सांगितले.
बसपासोबतही चर्चा
विदर्भवादी पक्ष व संघटना एकत्र आल्या आहेत. विदर्भाचे समर्थकअसलेल्या बसपासोबतही आमची चर्चा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याशिवाय विदर्भाच्या प्रश्नावर ज्या काही संघटना असतील त्या सर्वांशी चर्चा करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
आठवलेंनी अगोदर सत्ता सोडावी
रिपाइंचे रामदास आठवले हे विदर्भ राज्याचे समर्थक असले तरी ते सत्तेत आहेत. त्यांना खरंच वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित करावा. ते सत्तेतून बाहेर पडले तर त्यांचे स्वागत करू, असे अ‍ॅड. चटप यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

 

Web Title: Vidarbhawadi united, contesting elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.