विदर्भवाद्यांचा सरकार विरोधात एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 11:30 PM2020-11-07T23:30:35+5:302020-11-07T23:33:10+5:30
Vidarbhawadi's Elgar against government हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात ७ डिसेंबरला येणाऱ्या सरकारचा विरोध करण्याचा व त्यासाठी निदर्शने करण्याचा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात ७ डिसेंबरला येणाऱ्या सरकारचा विरोध करण्याचा व त्यासाठी निदर्शने करण्याचा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीने घेतला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून व्हेरायटी चौकात ठिय्या आंदोलन व निदर्शने करण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री झालेल्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या निवडणूक समिती, धोरण समिती व कोर कमिटीच्या सदस्यांची संयुक्त ऑनलाईन बैठक अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी प्रस्तावना व विषयाची मांडणी केली तर अॅड. वामनराव चटप यांनी समारोप केला.
महाराष्ट्रातील सरकार विदर्भ विरोधी असल्याची टीका बैठकीत करण्यात आली. विदर्भातील सर्व जनतेचे कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल माफ करा, २०० युनिटपर्यंत वीज बिल मोफत करून त्यानंतरचे वीज बिल दर निम्मे करण्याची मागणी समितीने केली होती. त्यासाठी आंदोलनेही करण्यात आली होती. विदर्भात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलेली मदत अत्यल्प असल्याचाही समितीचा आरोप आहे.
विदर्भाच्या विकास कामावर निधी न देणे, बॅकलॉग वाढणे, उद्योग कपात करणे, विकास निधी मोठ्या प्रमाणावर कपात करणे असे या सरकारचे धोरण असल्याने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोध करून सरकार परत जाण्याचा सल्ला आंदोलनातून देणार असल्याची माहिती राम नेवले यांनी दिली. बैठकीत अॅड. वामनराव चटप, राम नेवले, रंजना मामर्डे, अॅड. सुरेश वानखेडे, मुकेश मासुरकर, विष्णूजी आष्टीकर, प्रकाश लढ्ढा, अरुण केदार, योगेश निलदावार, दामोधर शर्मा, अरुण मुनघाटे, अशोक पोरेड्डीवार, सुरेश जोगळे, सुनिता येरणे, नितीन अवस्थी, अनिल तिडके आदी सहभागी झाले होते.
विधान परिषद पदवीधर मतदार उमेदवार नाही
पूर्व व पश्चिम विदर्भामध्ये विधान परिषदेची पदवीधर मतदार संघात होत असलेल्या निवडणुकीमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून उमेदवार उभे न करण्याचा तसेच समर्थन न देण्याचा निर्णय कोर समितीच्या बैठकीत झाला आहे.