नागपुरात कपडे बदलताना तरुणीची व्हिडिओ क्लीप बनविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 09:39 PM2019-08-10T21:39:18+5:302019-08-10T21:40:39+5:30
चेंजिंग रूममध्ये मोबाईल लपवून कपडे बदलविताना दोन भामट्यांनी युवतीचा अश्लिल व्हिडीओ तयार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर युवतीने आरडाओरड करून कपड्याच्या शोरूमचा मालक आणि त्याच्या साथीदाराचे बिंग फोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चेंजिंग रूममध्ये मोबाईल लपवून कपडे बदलविताना दोन भामट्यांनी युवतीचा अश्लिल व्हिडीओ तयार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर युवतीने आरडाओरड करून कपड्याच्या शोरूमचा मालक आणि त्याच्या साथीदाराचे बिंग फोडले. तिने पोलिसांत तक्रार नोंदवल्यामुळे पोलिसांनी या दोघांना अटक केली. सीताबर्डीतील फ्रेण्डस नामक कपड्याच्या दुकानात शुक्रवारी रात्री ही संतापजनक घटना घडली.
तक्रार करणारी १७ वर्षीय युवती बाहेरगावची रहिवासी आहे. ती नागपुरात अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असून, हिंगण्यात भाड्याच्या रूममध्ये राहते. शुक्रवारी रात्री एका मैत्रीणीसह सीताबर्डीतील फ्रेण्डस नामक रेडिमेड कपड्याच्या दुकानात आली. आवडलेला ड्रेस बरोबर होतो की नाही, ते घालून बघण्यासाठी ती चेंजिंग रूममध्ये गेली. तेथे ती कपडे बदलवित असताना तिला चेंजिंग रूममध्ये कोप-यात मोबाईल लपवून दिसला. तिने तो काढून बघितला तेव्हा त्यात व्हिडीओ शुटिंग सुरू असल्याचे तिला दिसले. कपडे बदलविताना तिला स्वत:चा व्हिडीओ दिसला. ते पाहून तिने आणि तिच्या मैत्रीणीने दुकानमालक आरोपी किसन इंदरचंद अग्रवाल (वय ५४, राधाकृष्ण मंदीर समोर, वर्धमाननगर) याला जाब विचारला. आपले बिंग फुटल्याचे बघून त्याने हा मोबाईल दुकानात काम करणारा आरोपी निखिल उर्फ पिंटू दीपक चौथमल (वय २७, रा. आंबेडकरनगर, पाचपावली) याचा असल्याचे सांगून प्रकरण निस्तरण्याचा प्रयत्न केला. युवतीने लगेच सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपी अग्रवाल आणि चौथमलला अटक केली.
अनेकींचे बनविले व्हिडीओ ?
आपल्या कुकृत्याचा बोभाटा होऊ नये म्हणून आरोपी दुकानदार आणि साथीदाराने बरेच प्रयत्न केले. युवतीची क्षमायाचना करून आणि तिला बदनामीचा धाक दाखवून तिच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवती आणि तिच्या मैत्रीणीने आरोपींना त्यांच्या कुकृत्याचा धडा शिकविण्यासाठी ठामपणे पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
आरोपींनी अशा प्रकारे आणखी काही महिला मुलींचे व्हिडीओ तयार केले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी कसून तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.