पती-पत्नीच्या वादाचा व्हिडीओ दोन वर्षांनंतर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:08 AM2021-09-19T04:08:25+5:302021-09-19T04:08:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काैटुंबिक कलहातून पत्नीसोबत झालेल्या वादाचा व्हिडीओ बनवून तो दोन वर्षांनंतर फेसबुकवर अपलोड करणाऱ्या नवरोबाविरुद्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काैटुंबिक कलहातून पत्नीसोबत झालेल्या वादाचा व्हिडीओ बनवून तो दोन वर्षांनंतर फेसबुकवर अपलोड करणाऱ्या नवरोबाविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आलविंद जो फ्रान्सिस (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. तो एका कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. लॉकडाऊनमुळे त्याला नोकरी गमवावी लागली. त्यामुळे सध्या तो रिकामाच आहे. दहा वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी शिक्षिका आहे. त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. काही वर्षांपासून त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. ती वाढतच गेली. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होऊ लागला. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यात असाच एक दिवस वाद झाला आणि तो विकोपाला गेल्यामुळे अखेर दोघांनी अंगावर रॉकेल घेतले. यावेळी त्यांच्या मुलीच्या अंगावरही रॉकेल पडून ते डोळ्यात गेल्याने ती वेदनांनी ओरडत होती. आरोपी आलविंदने त्यावेळी या वादाचा व्हिडीओ मोबाइलमध्ये बनवून ठेवला होता. त्यावेळी तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आलविंदविरुद्ध कलम ४९८ अन्वये गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर, हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी बनवून ठेवलेला व्हिडीओ गुरुवारी रात्री ११ वाजता आरोपी आलविंदने फेसबुकवर अपलोड केला. पती-पत्नीचा वाद अन् मुलीचे रडणे या व्हिडीओत दिसते. खासगी आयुष्यातील वाद अशा प्रकारे जाहीर केल्यामुळे मुलीचा अन् आपला विनयभंग झाल्याची तक्रार महिलेने शुक्रवारी मानकापूर ठाण्यात नोंदविली. ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांनी या तक्रारीची दखल घेत, आरोपी आलविंदविरुद्ध विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
---
आरोपीची शोधाशोध
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच, आरोपी आलविंद घरून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
----