वाहतूक पोलिसाचा लाच स्वीकारताना व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2023 08:00 AM2023-04-26T08:00:00+5:302023-04-26T08:00:07+5:30
Nagpur News संत तुकडोजी महाराज चौकात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाचा वाहतूक नियम तोडणाऱ्या एका सरकारी महिला कर्मचाऱ्याकडून लाच स्वीकारताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
विराज देशपांडे
नागपूर : संत तुकडोजी महाराज चौकात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाचा वाहतूक नियम तोडणाऱ्या एका सरकारी महिला कर्मचाऱ्याकडून लाच स्वीकारताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. वाहतूक पोलिसांच्या प्रामाणिकतेवरही प्रश्नचिन्ह लागले.
सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. लोकमतने यापूर्वी वेळोवेळी अशा घटनांना प्रसिद्धी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी घडली. तुकडोजी चौकातील वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम तोडणाऱ्या काही वाहनचालकांना थांबविले होते. त्यात संबंधित सरकारी महिला कर्मचाऱ्याचाही समावेश होता. त्यांनी डोक्यात हेल्मेट घातले नव्हते. पोलिसाने त्यांना चालान करण्याची तंबी देऊन ३०० रुपयांची लाच मागितली. दरम्यान, वाहतूक नियम तोडणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. वाहतूक पोलिसाने या व्यक्तीलाही १ हजार रुपये मागितले होते. शेवटी त्यांची ५०० रुपयात तडजोड झाली. लोकमतने हा व्हिडीओ वाहतूक पोलिस उपायुक्त चेतना तिडके यांना पाठवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.
असा आहे व्हिडीओमधील संवाद
२७ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये वाहतूक पोलिस व सरकारी महिला कर्मचारी चालानबाबत सविस्तर चर्चा करताना दिसत आहे. त्यांच्यामधील संवाद पुढीलप्रमाणे आहे.
महिला : तुम्ही चालान करतो म्हणताय आणि ३०० रुपयेदेखील मागत आहात. तुम्ही ३०० रुपये हवे आहेत, चालान रद्द करतो, असे म्हणायला पाहिजे.
पाेलिस : तुम्ही पैसे द्या. मी काहीच करीत नाही. मी चालानची प्रत काढली नाही. मी केवळ गाडीचा नंबर टाकला आहे.
महिला : मी तुमच्यासारखीच सरकारी कर्मचारी आहे. तुम्ही चुकीचे वागत आहात.