VIDEO - पातुरची रेणुका माऊली
By admin | Published: October 1, 2016 04:07 PM2016-10-01T16:07:13+5:302016-10-01T16:50:37+5:30
पातूर येथील परिसरात सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुकादेवी संस्थान (टेकडी) येथे दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सव शनिवारपासून सुरू होत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पातूर, दि. १ - पातूर येथील परिसरात सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुकादेवी संस्थान (टेकडी) येथे दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सव शनिवारपासून सुरू होत आहे. यानिमित्त दरवर्षी भक्तांची मोठी मांदियाळी जमते.
सुवर्णा (बोर्डी) नदी किनारी असलेल्या या टेकडीवर हे मंदिर वसले आहे. दर मंगळवारी व नवरात्रात हा परिसर भक्तांच्या गर्दीने गजबजून गेलेला असतो. मातेच्या गडावर जाण्यासाठी सिमेंटच्या २४० पाय-या असून पाय-याच्या बाजूला वयोवृद्धांसाठी आधाराला लोखंडी रेलिंग लावले आहे. पाय-या चढतानाच मंदिराचे व्यवस्थापक स्व. दीनानाथ महाराज यांची समाधी, हनुमान मंदिर, गणपती मंदिर लागते.
नवसाला पावणारी आई भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी धावून येते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. दर्शन झाल्यावर भक्त स्वत:ला धन्य समजतो व गडावर पुन्हा येण्याचा संकल्प करून परततो. नवरात्रात देवीची आरती सकाळी ६.३० वाजता व संध्याकाळी ६ वाजता होते.
सकाळच्या आरतीला मोजून हजारावर भक्त हजर असतात. गडावर कृष्ण, दत्त, राम, अनुसया माता, महादेव, गायत्री मंदिर व श्रीराम मंदिर आदी मंदिरे आहेत. अकोला, वाडेगाव, बाळापूर, मालेगाव, बार्शीटाकळी आदी परिसरातूनही लोक सकाळीच आरतीला येतात. एवढी गर्दी बघून पातूर हे मिनी माहूर असल्याची प्रचिती येते.
संस्थानाने देणगीदारांच्या व भक्ताच्या मदतीतून अनेक सुधारणा केल्या आहेत. लहान मुलांसाठी पाळणे, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृह, बसण्याची सुविधा झाल्यामुळे लोक येथे इतर वेळी सहलीला येतात. शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीही येथे येतात. टेकडीवरून शहरांचे विहंगम दृश्य दिसते. टेकडीवरून दृष्टिक्षेप टाकल्यास उत्तरेकडे नानासाहेबांचे पुरातन मंदिर, दक्षिणेकडे शाहबाबूंचा दर्गा, गडाच्या पायथ्याशी तपे हनुमान मंदिर दिसते.