नागपुरात बारावीच्या परीक्षा केंद्राचे होणार चित्रीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:32 AM2019-02-12T11:32:38+5:302019-02-12T11:34:15+5:30
बारावीच्या परीक्षेत यंदा प्रथमच नागपूर विभागीय मंडळाकडून परीक्षा केंद्राचे बाहेरून व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीच्या परीक्षेत यंदा प्रथमच नागपूर विभागीय मंडळाकडून परीक्षा केंद्राचे बाहेरून व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियान जोरकस राबविण्याचा नागपूर बोर्डाचा संकल्प असून, संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेत नागपूर बोर्डातून १,६६,२३५ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. ४७१ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाईन परीक्षा प्रवेशपत्र पोहचले आहे. या परीक्षेसाठी ४७१ केंद्रसंचालक व सहा. केंद्रसंचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ६००० पर्यवेक्षक, १२०० मॉडरेटर, ६५०० व्हॅल्युएशन करणाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्डाकडून यावर्षी कॉपीमुक्त अभियानावर जोर देण्यात येत आहे. त्यासाठी ४५ भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच प्रत्येक जिल्ह्याला व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी एका पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाची जबाबदारी डायटच्या महिला पथकावर देण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर जो हुल्लडपणा चालतो, कॉपी पुरविण्याचे प्रकार घडतात, त्यावर अंकुश मिळविण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. नागपूर बोर्डांतर्गत जे संवेदनशील केंद्र आहे, त्यावर हे पथक विशेष लक्ष ठेवणार आहे.
परीक्षेच्या कामातून सुटका करण्यासाठी शिक्षकांची गर्दी
बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षकांच्या मॉडरेटर, पर्यवेक्षक म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहे. यापासून सुटका करण्यासाठी शिक्षकांची बोर्डामध्ये रेलचेल वाढली आहे. कुणी आजाराची कारणे, कुणी लग्न सोहळे, काहींच्या वैयक्तिक अडचणी सांगून ड्युटी रद्द करण्याची मागणी करीत आहे. अनेक शिक्षक संघटनांचाही जोर दाखवित आहे. काहींनी राजकीय शिफारशीचाही अवलंब केला आहे. शिक्षकांकडून सुरू असलेल्या या प्रकारामुळे बोर्डाच्या कामात खोळंबा निर्माण होत आहे.