कारच्या बोनेटवर बसून गुंडांचा हैदोस; दारूच्या नशेत शिव्या देतानाचा व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 12:07 PM2022-04-02T12:07:26+5:302022-04-02T12:21:06+5:30
घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी अश्विनच्या साथीदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, अश्विन पोलिसांच्या हाती लागला नाही.
नागपूर : पश्चिम नागपुरातील कुख्यात गुंड अश्विन तुर्केलने कारच्या बोनेटवर बसून दारू पिताना बजाजनगरात जोरदार हैदोस घातला. बजाजनगर पोलिसांनी तुर्केल व त्याच्या साथीदारांवर प्रतिबंधक कारवाई केली होती. दहा दिवसांनंतर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस सजग झाले आहेत.
अश्विनने आपल्या साथीदारांच्या मदतीने धरमपेठ येथे रितेश बैसवारेचा खून केला होता. त्याच्या विरोधात हप्ता वसुली, दंगल घडवे, हल्ला करणे, आदी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची पश्चिम नागपुरात दहशत आहे. अश्विनने २१ मार्चच्या रात्री बजाजनगर चौक ते व्हीएनआयटी गेटच्या दरम्यान कारच्या बोनेटवर बसून दारू ढोसली आणि हे कृत्य करताना परिसरात दहशत माजविली. कारमध्ये त्याचे साथीदार आदित्य हरिदास डागोर, दिनीत प्रदीप तुर्केल, अभय ललित झंडोट व रोहण छोटेलाल खंडारेही होते. घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी अश्विनच्या साथीदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, अश्विन पोलिसांच्या हाती लागला नाही.
या घटनेच्या व्हिडिओमध्ये अश्विन बोनेटवर बसून दारू पिताना दिसतो आहे. सोबतच अश्विन व त्याचे साथीदार नागरिकांना शिव्या देताना दिसत आहेत. त्याच आधारावर बजाजनगर पोलिसांनी अश्विन व त्याच्या साथीदारांवर गुंडगिरी करण्याचा व धमकाविण्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. बजाजनगर चौक ते व्हीएनआयटी गेट दरम्यान रेस्टेराँ, बार, हुक्का पार्लरसह अनेक चर्चित अड्डे आहेत. येथे नियमित कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. अश्विन गँग हप्ता वसूल व विद्यार्थिनींना आकर्षित करण्याची परिसरात गोंधळ घालत असतो. बऱ्याच काळापासून अश्विनवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे तो निर्ढावला होता. त्याला स्थानिक नेत्यांचाही पाठिंबा असल्याचे सांगितले जाते.