“सुषमा अंधारेंनी दिलगिरी पत्र द्यावे, अन्यथा हक्कभंग प्रस्तावाची परवानगी देऊ”: नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 04:30 PM2023-12-20T16:30:11+5:302023-12-20T16:33:41+5:30
Winter Session Maharashtra 2023: हे स्वतःला ज्ञानी समजतात. मग दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य असू नये, अशी विचारणा नीलम गोऱ्हे यांनी केली.
Winter Session Maharashtra 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेनंतर आता विधान परिषदेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याच्या मागणीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली. यावर, सुषमा अंधारे यांनी आठ दिवसांत दिलगिरी पत्र द्यावे, अन्यथा हक्कभंग प्रस्तावाची परवानगी द्यावी लागेल, असा इशारा नीलम गोऱ्हे यांनी दिला.
विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांना सभागृहात बोलण्याची संधी नीलम गोऱ्हे देत नसल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सभागृहानेही याची दखल घेतली. रवींद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य असताना नीलम गोऱ्हे बोलण्याची कशी काय परवानगी देऊ शकतात? असा प्रश्न प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. याप्रकरणी उपसभापतींची बदनामी केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य असू नये?
यावर नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका मांडली. रवींद्र धंगेकरांना बोलण्यास नीलम गोऱ्हे संधी देत नाहीत, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. रवींद्र धंगेकर यांना सुषमा अंधारेंच्या चुकीच्या वक्तव्याची जाणीव होईल आणि ते त्यांना समजावतील. पाच ते सहा दिवस त्यांची वाट पाहिली. उद्धव ठाकरे सभागृहात येत असतात. आपले प्रवक्ते इतके चुकीचे बोलले आहेत यावरून ते समज देतील, असे वाटले होते. पण त्यांना त्यांच्या चुकीच्या वक्तव्याची जाणीव कोणीच करून दिली नाही. त्या ज्ञानी आहेत. हे स्वतःला ज्ञानी समजतात. त्यांना सर्व समाज सर्टिफिकेट देतो की ते ज्ञानी आहेत. मग त्यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य असू नये, अशी विचारणा नीलम गोऱ्हे यांनी केली.
दरम्यान, सुषमा अंधारेंची ही चूक असल्याचे सचिन अहिरांनी मान्य केले. पण सुषमा अंधारेंनी आता तसे लेखी पत्र दिले पाहिजे. अज्ञानातून किंवा गैरसमाजतून त्यांनी तसे वक्तव्य केले, हे त्यांनी मान्य केले पाहिजे. आठ दिवसांत तसे पत्र आले नाही तर प्रवीण दरेकरांना त्यांच्यावर हक्काभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देणार आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.