विधान भवन बाटल्यांनी तुंबले; कामकाज पावसाने धुतले !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 06:17 AM2018-07-07T06:17:59+5:302018-07-07T06:17:59+5:30
शहरासह संपूर्ण नागपूर जिल्ह्याला शुक्रवारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सकाळी ८.३० वाजल्यापासून अवघ्या सहा तासांत २६३.५ मिमी पावसाची नोंद झाली.
नागपूर : शहरासह संपूर्ण नागपूर जिल्ह्याला शुक्रवारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सकाळी ८.३० वाजल्यापासून अवघ्या सहा तासांत २६३.५ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने नागपुरात एक बळी घेतला. बहुतांश वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागपूरचे ‘जलपूर’ झाले. विधानभवनही जलमय झाले. तेथील इलेक्ट्रिक केबिनमध्ये पाणी शिरून वीज खंडित झाल्याने विधिमंडळाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवत ‘पाऊस कोंडी’ केली. ‘सरकार नागपुरात अन् नागपूर पाण्यात’ असे चित्र होते.
नागपुरातील दोनशेहून अधिक वस्त्यांमध्ये पाणी तुंबले. सुरक्षित सिव्हिल लाइन्समधील मंत्र्यांची निवासस्थान असेलला रविभवन व आमदार निवास परिसरही जलमय झाला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कुटीरसह बऱ्याच मंत्र्यांच्या बंगल्यांत पाणी शिरले. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याबाहेरही गुडघाभर पाणी साचले होते. पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हाधिकाºयांनी शाळांना सुटी जाहीर केली आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. शुक्रवारी सकाळनंतर पावसाचा जोर जास्त वाढला.
मुख्यमंत्र्यांचा ‘वॉच’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनातील परिस्थितीचा आढावा घेतला. नागपूर महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून पावसामुळे विविध भागात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली.
शहरात ७00 ठिकाणी ३८०० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याद्वारेमुख्यमंत्र्यांनी पूरग्र्त भागांची केली. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मिशनमोडवर काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या.
कामकाज तहकूब
विधानसभेचे कामकाज सकाळी १० वाजता सुरू होणार होते. पण रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे बहुतांश आमदार वेळेवर सभागृहात पोहचू शकले नाहीत. विधानभवन परिसरातील गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता.
त्यामुळे तिथे तलावाचे स्वरुप आले. विधानभवनात वीज नसल्याने कामकाज एक तास उशिरा सुरू करण्याची घोषणा विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
त्यानंतरही सुधारणा न झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
दारूच्या बाटल्या
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाण्यात उतरून विधानभवन परिसराची पाहणी केली. पाणी काढण्यासाठी तातडीने मोटार पंप लावण्यात आले. विधानभवनाच्या मागील गटार तुंबले होते. विधानसभा, परिवहनमंत्री दिवाकर रावते, बावनकुळे यांच्या समक्ष गटाराचे झाकण काढले असता आत दारुच्या बाटल्यांचा खच सापडला.