विदर्भाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:08 PM2018-07-28T22:08:48+5:302018-07-28T22:15:00+5:30

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी धापेवाडा येथे शनिवारी वारकऱ्यांसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’च्या घोषाने परिसर दुमदुमला होता. पहाटे ५.३० वाजता विठ्ठल-रुक्मिणीचा अभिषेक व महापूजा आटोपल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. शनिवार हा आषाढी एकादशी यात्रेचा शेवटचा दिवस होता.

In the Vidharbha's Pandhari crowed of devotee | विदर्भाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी

विदर्भाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी

googlenewsNext
ठळक मुद्देआषाढी एकादशी यात्रेची सांगता : शेकडो दिंड्या व पालख्यांची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी धापेवाडा येथे शनिवारी वारकऱ्यांसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’च्या घोषाने परिसर दुमदुमला होता. पहाटे ५.३० वाजता विठ्ठल-रुक्मिणीचा अभिषेक व महापूजा आटोपल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. शनिवार हा आषाढी एकादशी यात्रेचा शेवटचा दिवस होता.
आ. सुधाकर कोहळे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, डॉ. राजीव पोतदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर, जिल्हा परिषद सदस्य अरुणा मानकर, अ‍ॅड. प्रकाश टेकाडे, दिलीप धोटे, बाबा कोढे, रुद्रप्रतापसिंह पवार, आदित्यप्रतापसिंह पवार, भानुप्रतापसिंह पवार, सरपंच मनोहर काळे यांनीही दर्शन घेतले.
धापेवाड्याच्या या यात्रेला ३०२ वर्षांची परंपरा आहे. ठिकठिकाणच्या दिंडी व पालखी पथक दाखल झाले होते. वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात ‘जय हरी विठ्ठल’चे नामस्मरण करीत नाचत होते. विविध वेशभूषेतील वारकरी आकर्षणाचे केंद्र ठरले होते. कळमेश्वरच्या राष्ट्रवंदना ढोलताशा पथकाने सर्वांना आकर्षित केले होते. यात्रेत खेळण्यांसह विविध वस्तूंची दुकाने सजली होती. मुलांसह अनेकांनी मनसोक्त खरेदी केली. बच्चेकंपनीने आकाशपाळणा व ड्रॅगनचा आनंद लुटला.
स्वयंसेवी संस्थांच्यावतीने वारकरी व भाविकांसाठी पाणी, चहा नाश्ता, महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, शिवाय चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पिण्याच्या पाण्यासाठी कळमेश्वर, मोहपा व सावनेर नगर पालिकेने विशेष सहकार्य केले. भाविकांसाठी नागपूर, सावनेर, कळमेश्वर बसस्थानकाहून अतिरिक्त बसेस सोडल्या होत्या.
यशस्वितेसाठी आदित्यप्रतापसिंह पवार, भानुप्रतापसिंह पवार, रामदास पांडे, विलास वैद्य, निखील गडकरी, अरुण चिखले, प्रभाकर रानडे, कृष्णप्रतापसिंह पवार, शंकर ठाकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवाळे, मारोतराव धोटे, अनिल डोईफोडे, दीपक पराते, मंगेश धोटे, आशिष ढोले, प्रवीण मेश्राम, अनिकेत वाघ यांनी सहकार्य केले.

भाविकांनी फुलली चंद्रभागा
विदर्भासह मध्य प्रदेश व सूरत येथील दिंड्या, पालख्या धापेवाडा येथे दाखल झाल्या होत्या. वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या पात्रातून मार्गक्रमण करताना भाविकही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे चंद्रभागा भाविकांनी फुलली होती. शिवाय, शेकडो भाविकांनी चंद्रभागेत आंघोळ करून पांडुरंगासोबतच कोलबास्वामी व अन्य संतांचे दर्शन घेतले. यात्रेच्या काळात येथे रात्रभर भजन व कीर्तनाचे आयोजन केले होते. भाविक वारकऱ्यांवर लाह्यांचा वर्षाव करीत होते.

संतांची कर्मभूमी
धापेवाडा ही संतांची कर्मभूमी आहे. श्री कोलबास्वामी यांच्यासह धर्मशेटी रंगारी बाबा, संत मकरंदपुरी महाराज, आखूंजी बाबा, रघुसंत महाराज, संत वारामाय, ब्रम्हचारी महाराज, ढेबुजी बुवा, झेंडेवाले महाराज, जमनागिरी महाराज यांचेही येथे वास्तव्य होते. येथे कोलबास्वामी महाराज, संत रघुसंत महाराज, संत मकरंदपुरी महाराज, संत वारामाय व आखुंंजी बाबांची मंदिरे आहेत. ज्यांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही, ते धापेवाडा येथे येत असल्याचे भाविकांनी सांगितले.

Web Title: In the Vidharbha's Pandhari crowed of devotee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.