कोरोनासाठी दक्षता : विदर्भातील ५ व्याघ्र प्रकल्प आणि ३ अभयारण्ये राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:14 AM2020-03-17T00:14:04+5:302020-03-17T00:15:54+5:30
राज्यात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वन पर्यटन बंद ठेवले जाणार आहेत. यात विदर्भातील ५ संरक्षित व्याघ्र प्रकल्प व ३ अभयारण्ये पुढील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वन पर्यटन बंद ठेवले जाणार आहेत. यात विदर्भातील ५ संरक्षित व्याघ्र प्रकल्प व ३ अभयारण्ये पुढील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आले आहेत.
बंद ठेवल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागझिरा व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प यासोबतच टिपेश्वर अभयारण्य, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य आणि मेळघाट अभयारण्याचा समावेश आहे. विदर्भातील ताडोबासह अन्य प्रकल्पांना भेटी देणाऱ्या देशी व विदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या संपर्कात येणाºया वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना विषाणूंची बाधा होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीपत्रकात १८ मार्चच्या सकाळपासून हे आदेश लागू होतील असे म्हटले आहे. टिपेश्वर अभयारण्य १७ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय येथील जिल्हाधिकाºयांनी घेतला आहे.