सतर्कतेने वाचला महिला-मुलींसह सहाजणांचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:15+5:302021-08-26T04:12:15+5:30
नागपूर : दारुड्या पतीपासून त्रस्त होऊन मुलींसह आत्महत्येसाठी आलेल्या पत्नीसह सहाजणांना बुधवारी गांधीसागर तलावात आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले. ...
नागपूर : दारुड्या पतीपासून त्रस्त होऊन मुलींसह आत्महत्येसाठी आलेल्या पत्नीसह सहाजणांना बुधवारी गांधीसागर तलावात आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले. पानबुडे आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे सहाही जणांचा जीव वाचला.
खरबी निवासी ३२ वर्षीय विवाहिता मजुरी करते. पतीही मजूर आहे. दारूच्या व्यसनाने पती पत्नीला सतत त्रास देतो. तीन महिन्यांपूर्वी विवाहिता मुलींसह आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गांधीसागर तलावावर आली होती. बुधवारीही दुपारी ३.३० वाजता दोन-दोन वर्षांच्या जुळ्या मुली आणि सात वर्षांच्या मुलीसह गांधीसागर तलावावर आली. ती गणेशमूर्ती विसर्जन घाटावर बसली होती. पानबुडा जगदीश खरे याचे विवाहितेवर लक्ष गेले. जगदीशने याची सूचना तत्काळ पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विवाहिता आणि मुलींना ठाण्यात आणले. महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विवाहितेला मार्गदर्शन करून आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले. महिलेला मदतीचे आश्वासन देत पतीसह घरी रवाना करण्यात आले. विवाहिता आणि तिच्या मुलींचा जीव वाचविल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी गांधीसागर तलावाची निगरानी वाढविली आहे.
दुसऱ्या घटनेत सायंकाळी ६.३० वाजता जिल्हा परिषदेचा शिक्षक आणि रिकव्हरी एजंटचे काम करणारा युवक संदिग्ध अवस्थेत तलावाच्या काठावर दिसून आले. चौकशी केल्यानंतर शिक्षकाने पत्नीशी विवाद झाल्याने, तर रिकव्हरी एजंटने अन्य कारणांनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आल्याचे सांगितले. दोघांनाही गणेशपेठ ठाण्यात आणून मार्गदर्शन करण्यात आले. तीन तासांत सहा लोक आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गांधीसागर तलावाजवळ आल्याने पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. यापूर्वीही गणेशपेठ पोलिसांनी तीन लोकांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले होते. गांधीसागर तलाव आत्महत्या करण्यासाठी बदनाम आहे. आतापर्यंत वाचविण्यात आलेल्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्याचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांनी सांगितले.