उपराजधानीचा सजग प्रहरी काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:32 AM2018-08-09T00:32:07+5:302018-08-09T00:36:53+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपुरात झालेल्या ऐतिहासिक चळवळीचे प्रत्यक्षदर्शी, बदलत्या नागपूरला अनुभवणारे एक सुजाण पत्रकार आणि समाजसेवेचा आयुष्यभर वसा जपलेले एक ज्येष्ठ समाजसेवी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू चौबे यांचे बुधवारी रात्री ११.३० वाजता अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपुरात झालेल्या ऐतिहासिक चळवळीचे प्रत्यक्षदर्शी, बदलत्या नागपूरला अनुभवणारे एक सुजाण पत्रकार आणि समाजसेवेचा आयुष्यभर वसा जपलेले एक ज्येष्ठ समाजसेवी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू चौबे यांचे बुधवारी रात्री ११.३० वाजता अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे तीन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे.
मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. १६ जुलैपासून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे उपचार सुरू होते. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने नागपुरातील सामाजिक चळवळींना आधार देणारा, त्यांचे पालकत्व स्वीकारणारा आणि प्रसंगी कुठलीही किंमत चुकविण्याची तयारी ठेवणारा निरपेक्ष सामाजिक कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. उमेशबाबूंच्या निधनाने केवळ नागपुरातीलच नाही तर विदर्भातील सामाजिक चळवळी आणि कार्यकर्त्यांना दीर्घकाळपर्यंत पोरकेपणा जाणवणार आहे.
उमेशबाबू यांचा जन्म १७ एप्रिल १९३३ रोजी हरदा मध्य प्रदेश येथे झाला. त्यांचे मूळ गाव होलीपुरा त. बह, जि. आग्रा उत्तर प्रदेश होते. नागपुरातून त्यांनी शिक्षण घेतले आणि येथेच स्थायिक झाले. उमेशबाबू हे नागपूरचे सजग प्रहरी म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी दशेपासूनच ते आंदोलनात सक्रिय झाले. पुढे पत्रकार म्हणून त्यांनी विविध विषयांना वाचा फोडली. पत्रकार असतानाच ते कामगारांच्या चळवळीत सामील झाले. त्यांचा अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग होता. समाजात कुणावरही, कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर सर्वात अगोदर आवाज उचलणारे व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ समाजसेवी उमेशबाबू चौबे होते. बाबूजी म्हणून लोक त्यांना ओळखायचे. पुढे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. अनेक भोंदूबाबांचे त्यांनी पितळ उघडे पाडले. सामाजिक कार्यासोबतच पत्रकारिता, नाट्य, साहित्य अशा विविध क्षेत्रात ते शेवटपर्यंत सक्रिय राहिले. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्याच्या शेवटपर्यंत लढणारे ते खऱ्या अर्थाने एक सजग प्रहरी होते.