विजय दर्डा यांनी घेतली शरद पवारांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 10:29 AM2019-11-15T10:29:52+5:302019-11-15T10:32:26+5:30
राज्यात सत्तास्थापनेची राजकीय कोंडी अद्यापही कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गुरुवारपासून विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी पवार यांची भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात सत्तास्थापनेची राजकीय कोंडी अद्यापही कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गुरुवारपासून विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतकरी समस्या तसेच वर्तमान राजकीय स्थिती याबाबत दोघांमध्येही बंदद्वार चर्चा झाली.
सकाळी पावणेनऊच्या सुमारास दर्डा यांनी पवार यांची वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये भेट घेतली. व्यस्त वेळापत्रक असतानादेखील पवार यांनी दर्डा यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. या भेटीदरम्यान दर्डा यांनी अकाली पावसामुळे खराब झालेली फळे बॉक्समध्ये देऊन पवार यांना समस्येची गंभीरता लक्षात आणून दिली. यावेळी गुरुवारी केलेल्या दौऱ्याबाबत पवार यांनी भावना व्यक्त केल्या. तर विदभार्तील शेतकऱ्यांचे अस्मानी संकटामुळे कंबरडे मोडले असून त्याला त्वरित आधाराची गरज असल्याचे प्रतिपादन दर्डा यांनी केले. या बैठकीत राजकीय मुद्द्यांवर काय चर्चा झाली यासंदर्भात दर्डा यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.
शेतकऱ्यांना लगेच मदत देणारी व्यवस्था हवी : पवार
शेतकऱ्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा हवा. त्यांच्या मालाला भाव मिळायला हवा व अस्मानी संकट आल्यावर लगेच आर्थिक मदत मिळायची व्यवस्था हवी, असे मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केले.