विजय दर्डा यांनी उद्योजकांना सांगितली नेतृत्व क्षमता विकासाची पंचसूत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 07:30 AM2022-01-28T07:30:55+5:302022-01-28T07:34:18+5:30
नाहर जितो बिजनेस नेटवर्क मेन्टरशिप कार्यक्रमात मान्यवरांचे मनोगत
नागपूर : लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांंनी उद्योजक आणि युवकांना नेतृत्व क्षमता विकसित करण्याचा मूलमंत्र दिला. सहकाऱ्यांसोबत संवाद साधणे, त्यांच्यातील गुण ओळखून त्यानुसार जबाबदारी देणे, स्वत:ला ओळखणे, विचार आणि मनासारखे काम करण्याचे स्वातंत्र्य देणे आणि मजबूत नियंत्रण राखणे अशा पंचसूत्रीचा सल्ला त्यांनी दिला. हे आत्मसात केले तर, कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे नेतृत्व करता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘नाहर जितो बिजनेस नेटवर्क’च्या मेन्टरशिप उपक्रमाअंतर्गत ‘मीट द मेन्टर’ कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी जितो बिजनेस नेटवर्क मेन्टरशिप कार्यक्रमाच्या राष्ट्रीय समन्वयक दिव्या मोमाया यांनी दर्डा यांचा परिचय करून दिला. जेबीएनचे चेअरमन संजय जैन व दिव्या यांनी या कार्यक्रमादरम्यान दर्डा यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, परिस्थिती कशीही असो, संघर्ष करणे हा आपला धर्म आहे. महामारीच्या स्थितीत आपण लढलो आणि जिंकलो देखील. जैन धर्माचे तत्त्व आणि सार ज्या व्यक्तीने समजून घेतले असेल तो कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतो. पूजा करण्यासाठी मंदिरातच जाण्याची गरज नाही. ‘पूजा’चा अर्थ विश्वास, त्याग, उत्तम आचरण आणि क्षमा असा आहे.
दर्डा म्हणाले, नेतृत्व जादूची छडी फिरवून निर्माण होत नाही. एक-दुसऱ्यावर विश्वास, समर्पण, त्याग आणि जोखीम स्वीकारण्याची वृत्ती यातून नेतृत्व निर्माण होते. यासाठी हिंमत असावी लागते. कर्म आणि वाणी यातील समानतेमधूनही नेतृत्व प्रगटते. यातून लोकांमध्ये विश्वास निर्माण होतो. ज्यांच्यात हे गुण नसतील ते नेतृत्व करू शकत नाहीत.
नेतृत्व क्षमता विकसित करण्यासाठी काय बदलायला हवे, या प्रश्नावर दर्डा यांनी आपल्या कुटुंबातील उदाहरण दिले. ते म्हणाले, आपले वडील जवाहरलाल दर्डा हे स्वत:च एक विद्यापीठच होते. यात जो कुणी शिकला तो यशस्वी झाला. त्यांच्याकडून मिळालेले संस्कार आम्हा दोन्ही भावंडांत आणि नंतरच्या पिढीत उतरले आहेत. नेतृत्व करणे याचा अर्थ सर्वांना सोबत घेऊन चालणे, सर्वांना विचारपूर्वक दिशा देणे, दुसऱ्याचे मत आणि विचारांचा सन्मान करणे. प्रसंगी एक पाऊल मागे घेण्याचा गुण नेतृत्वकर्त्यात असायला हवा. समन्वय, समर्पण आणि सन्मानाची भावना कुटुंबातूनच यायला हवी.
या प्रसंगी दर्डा यांनी माध्यम क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांनाही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आम्ही अन्य कोणते काम करावे, अशी वडिलांची मुळीच इच्छा नव्हती. त्यांची इच्छा होती की, आम्ही असे काही करावे की, ज्यात समाजसेवा असेल, लोकांचे दु:ख कमी करण्यासाठी विकासाची दिशा निश्चित असेल. वृत्तपत्र हे समाज बदलण्याचे साधन आहे. यामुळे या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. जनहितासाठी व्यवस्थेच्या विरोधातही माध्यमांना लिखाण करावे लागते. उद्योगपती अशा कामांपासून दूर राहतात. मात्र युवकांना आव्हान स्वीकारायचे असेल तर, त्यांनी या क्षेत्रात यायला हवे.
प्रारंभी ऋषभ सावनसुखा यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. डायरेक्टर इंचार्ज महेंद्र संदेशा यांनी स्वागत केले तर, मानवर्धन बैद यांनी आभार मानले.
सरकारने कामातील उत्तरदायित्व स्वीकारावे
nकॉपोर्रेट आणि सरकार यातील फरकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दर्डा म्हणाले, उद्योग जगतामधील निर्णय तत्काळ आणि विचारपूर्वक घेतले जातात. तिथे स्पर्धेचा विचार असतो. लाभ-नुकसानीचा प्रश्न असतो. घेतले ते परत करण्याची भावना असते. याउलट सरकारी कामात त्वरित निर्णय होत नाहीत. बहुमताची गरज असते. निर्णयावर अनेक समितींमध्ये चर्चा होते.
nसमाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जनप्रतिनिधींची सुद्धा मंजुरी घ्यावी लागते. असे असतानाही काम वेळेवर व्हायला हवे. हे लक्षात घेता ‘अकाउंटॅबिलिटी बिल’ आणण्याची मागणी केली आहे. जबाबदारी निश्चित झाल्यास सरकारी कामात विलंब होणार नाही.