विजय लिमये : पर्यावरणपूरक अंत्यविधीसाठी मोक्षकाष्ठ दहनाचा पूरक पर्याय; देशात दोन कोटी झाडांवर ‘अंत्यसंस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 10:54 PM2017-12-10T22:54:43+5:302017-12-10T23:03:45+5:30
या संकल्पनेतून शेतक-यांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतो असे ते म्हणाले. शेतीत पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेत कचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो.
नाशिक : भारतात दरवर्षी सुमारे अंदाजे एक कोटी लोक मृत्युमुखी पडतात व त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणा-या लाकडांच्या माध्यमातून जवळपास पंधरा वर्षे वयाची दोन कोटी झाडे कापली जातात. यामुळे एकूणच झाडांच्या कत्तलीनंतर त्यांच्यावरच एकप्रकारे अंत्यसंस्कार होत असल्याचे प्रतिपादन विजय लिमये यांनी केले.
निमित्त होते, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र आणि विश्वास ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने आयोजित ‘पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार’ विषयावर व्याख्यानाचे. सावरकरनगर परिसरातील विश्वास लॉन्सजवळील क्लब हाउसमध्ये रविवारी (दि.१०) झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी लिमये बोलत होते. नौदलातून सेवानिवृत्तीनंतर लिमये यांनी इको फ्रेण्डली लिव्हिंग फाउंडेशनच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार संकल्पनेविषयी जनजागृती अभियान हाती घेतले. व्याख्यानाप्रसंगी बोलताना लिमये म्हणाले, २०१५साली आमच्या संस्थेमार्फत पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रयोग राबविण्यात आला. यावेळी संस्थेने महिनाभरात १०० मृतदेहांवर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार यशस्वीरीत्या करण्यात आले. यानंतर सदर संकल्पनेविषयी नागपूर महापालिकेपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला. तसेच संस्थेने नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात राबविलेल्या प्रयोगाविषयी अहवाल महापालिकेला सादर केला. यानंतर महापालिकेने याबाबत गांभीर्याने विचार करत पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार पद्धती राबविण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्काराविषयीची संकल्पनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात गौरवोद्गारही काढले; मात्र राज्यात अद्याप फडणवीस सरकारकडून गांभीर्याने याकडे लक्ष दिले गेले नाही आणि दरवर्षी वनमंत्रालयाकडून राज्यात कोटींच्या कोटी रोपांच्या लागवडीचे उड्डाण करत वृक्षप्रेम दाखविण्याचा प्रयत्न होतो, हा विरोधाभास न पटणारा आहे.
...अशी आहे मोक्षकाष्ठ संकल्पना
मोक्षकाष्ठ संकल्पना पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी पूरक ठरणारी असल्याचा दावा लिमये यांनी केला आहे. या संकल्पनेतून शेतक-यांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतो असे ते म्हणाले. शेतीत पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेत कचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. यासाठी शेतकरी शेतीतला कचºयाची थेट विक्री करू शकतात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शेत कचरा यंत्रात टाक ल्यानंतर त्याचे गोलाकार लहान आकाराचे ओंडके तयार होतात; मात्र मागणी नसल्यामुळे अशा प्रकारची कारखाने राज्यात खूप कमी आहेत. नागपूरमध्ये आठ कारखाने कार्यान्वित असल्याचे त्यांनी सांगितले.